"फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार"
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:17 IST2025-02-12T09:17:08+5:302025-02-12T09:17:57+5:30
'फडणवीस, पवारांची जवळीक वाढली', मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही योजना आणल्या होत्या. मात्र, त्या योजना आता एकेक करून बंद केल्या जात आहेत

"फडणवीस-अजितदादांची जवळीक, एकनाथ शिंदेंसोबत दुरावा; २ महिन्यात मोठे बदल होणार"
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधील जवळीक वाढत चालली आहे. त्यांना जवळ करून एकनाथ शिंदे यांना दूर करणे, ही फडणवीस यांची रणनीती दिसत आहे. याचमुळे शिंदे नाराज दिसत असून येत्या दोन महिन्यांत राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार आहेत, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी केला आहे.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही योजना आणल्या होत्या. मात्र, त्या योजना आता एकेक करून बंद केल्या जात आहेत. हा त्यांना बाजूला करण्याचा एक प्रयत्न आहे, असे दमानिया यांनी सांगितले. संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने झाले आहेत; पण पोलिसांची भूमिका अजूनही संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक पुरावे दिले आहेत. त्यांच्या हत्येमागील तो बडा नेता कोण आहे, हे त्यांना अजून का कळले नाही? धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहील. त्यामुळे त्यांचा राजीनामा कधी घेणार, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे.