मुंबई: छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक 'कार्यकर्ते' असा केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली होती. संभाजीराजे यांच्या या ट्विटला रिप्लाय देत देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
"छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो", असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या रिप्लायमध्ये म्हटले आहे.
यापूर्वी, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीही ट्विट करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, असेही म्हटले आहे.
(देवेंद्र फडणवीसांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी - छत्रपती संभाजीराजे )
दरम्यान, काल म्हणजे ६ मे रोजी छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली होती. मात्र, या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक 'कार्यकर्ते' असा केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफर टीका होत होती. त्यानंतर टीका होताच देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट डिलिट केले आहे.