"राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे," असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, "ग्रामपंचायत निवडणुक निकालावर भाजपाचा आयटी सेल चुकीची माहिती देत आहे आणि त्यावर भाजपा मोठ्या विजयाचा दावा करत आहे तो धादांत खोटा आहे. सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा करून भाजपा स्वतःच स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे." "आम्ही सर्व जिल्ह्यातून माहिती घेतली असताना काँग्रेस पक्षाला घवघवित यश मिळालेले स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आहे तो त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत दाखवून दिला आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही," असेही पटोले म्हणाले.
फडणवीसांवर निशाणावेदांता फॉक्सकॉन प्रकरणी शिंदे-फडणवीस सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. गुजरात काय पाकिस्तान आहे का? असे म्हणून महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याचे ते समर्थन करताना दिसत आहेत. गुजरातमध्ये गुंतवणूक होत असेल तर त्याला कोणाचाच विरोध नाही पण महाराष्ट्रात होणारा हा प्रकल्प गुजरातच्या घशात घातला आहे. अशा प्रकारे महाराष्ट्र कमकुवत करून गुजरातच्या विकासाला हातभार लावला जात असेल तर ते आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारकडून वीजबिल, पाणी, जमीन यासह अनेक बाबतीत सवलतींचे मोठे पॅकेज दिलेले होते. महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी उद्योगांची पहिली पसंती आहे. महाराष्ट्र २०१४-१९ या काळातही देशात गुंतवणुकीत अग्रेसर होता आणि आजही आहे ही केंद्र सरकारची आकडेवारीच सांगते असेही नाना पटोले यांनी सांगितले.