मुंबई : गेले काही महिने एकामागून एक धक्कादायक घडामोडी अनुभवत असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यातील गुप्तगूमुळे एकच खळबळ उडाली आहे. भेट झाली, पण राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण दोघांनीही माध्यमांकडे दिले आहे. तथापि, चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला या निमित्ताने पेव फुटले आहे.
भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात प्रमुख समन्वयक म्हणून शिंदे यांच्या कार्यालयात अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले आशिष कुळकर्णी यांच्या मुंबईतील घरी फडणवीस-चव्हाण यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली. दोघेही वेगवेगळे पण जवळपास एकाचवेळी कुळकर्णी यांच्या घरी पोहोचले. याच ठिकाणी दोघांमध्ये अर्धा तास वेगळी चर्चा झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
अशोक चव्हाण यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. मी आशिष कुळकर्णी यांच्या घरी पोहोचलो तेव्हा ते बाहेर पडत होते. योगायोगाने उभ्या उभ्या भेट झाली. आमची बैठक वगैरे झाली नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.
फडणवीसांशी माझी भेट झाली, पण त्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. काँग्रेसचा परवा दिल्लीत मोर्चा आहे आणि त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे.- अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री.
फडणवीसांनी वाढविला सस्पेन्समंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात काँग्रेसचे दोन माजी मंत्री शपथ घेतील अशा वावड्या उठल्या आहेत. फडणवीस यांना पुण्यात याविषयी पत्रकारांनी विचारले असता त्यांनी मौन बाळगल्याने सस्पेन्स वाढला आहे. ‘अदृश्य हातां’पासून चर्चा सुरूaविधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते फुटली होती आणि शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी चव्हाण यांच्यासह दहा आमदार उशिराने पोहोचल्याने मतदानात भाग घेऊ शकले नव्हते. त्याचा संदर्भ या भेटीशी जोडला जात आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात, अशी चर्चा आहे. विश्वासदर्शक ठराव जिंकला तेव्हा, ‘काही अदृश्य हात पाठीशी आहेत’ असे विधान फडणवीस यांनी केले होते. तेव्हापासून चव्हाण भाजपामध्ये जाणार अशा चर्चा होत्या. चव्हाण यांनी मी काँग्रेस सोडणार, या वावड्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे नेते भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला खिंडार पडणार या केवळ अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही. जनतेची केवळ दिशाभूल करण्यासाठी या वावड्या उठविण्यात येत आहेत. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. चव्हाण यांच्यासंदर्भात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. - बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेफडणवीस व चव्हाण या दोन्ही नेत्यांची माझ्या घरी फक्त पाच मिनिटे भेट झाली. त्यावेळी माझी आई, पत्नी व नातेवाईक सगळे आजूबाजूला उपस्थित होते. जी काही चर्चा झाली ती सगळ्यांच्या समक्ष झाली. - आशिष कुळकर्णी