पुणे – हिंदुत्व ही संकुचित संकल्पना नाही. ही भू-सांस्कृतिक राष्ट्रवादाशी जोडलेली संकल्पना आहे. इथल्या मूळ विचारांना मानतात ती ही संस्कृती आहे. या हिंदुत्वाचा विचार भाजपा घेऊन चालली आहे. काही पक्षाने हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल. पण आम्ही हिंदुत्व विचारातूनच जन्माला आलोय. राष्ट्रवादातून जनसंघ, भाजपाची वाटचाल सुरू झाली अशा शब्दात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपा – काल, आज आणि उद्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींच्या नेतृत्वात भारत पुढे चालला आहे. कोरोना काळात भारताने सामना केला. आम्ही लस निर्मिती करू शकतो आणि कोट्यधीश लोकांना लसीचा पुरवठा करू शकतो ही भारताची क्षमता तयार झाली आहे. रशिया यूक्रेन हल्ल्यात अमेरिकेने दबाव आणला तरी भारताने स्पष्ट सांगितले आम्हाला भारतीयांचे हित पाहायचं आहे. अमेरिकेचे नाही. राष्ट्रवादाचा शाश्वत विचार, गरिबांचा विकास यातून भारत पुढे जाणार आहे. भारतात जन्म आणि भाजपासोबत काम करण्याची संधी यापेक्षा जीवनात मोठं काहीच असू शकत नाही. ते आम्हाला सगळ्यांना मिळालं त्याचे समाधान आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपाचा इतिहास आणि वर्तमान त्याचे भविष्य सामान्यांपर्यंत पोहचवण्याचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. एका शाश्वत विचाराला अंमलात आणणारी जी संघटना आहे त्याचं हे पुस्तक आहे. या पुस्तकात सगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही निवडणुका जिंकण्याची मशीन नाही. लोकशाहीत निवडणुका जिंकल्यावर अपेक्षित परिणाम करता येऊ शकतो त्यासाठी आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करतो. देशात २२ पक्षाच सरकार अटल बिहारी वाजपेयींनी आणलं तेव्हा किमान समान कार्यक्रम आखला गेला. तेव्हा वाजपेयींनी सांगितले होते जेव्हा भाजपाचं सरकार येईल तेव्हा कलम ३७० आणि राम मंदिर बांधू. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार आणल्यानंतर आपण ते पूर्ण केले असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
भारतीय संस्कृती, इतिहासाचा वाहक भाजपा
भारतीय संस्कृती, इतिहास यांचा वाहक कोण असेल तर भाजपा आहे. या देशाला पारतंत्र्यात टाकण्याकरता समाजाचं आत्मभान भंग करण्याचं काम होते. आमच्यावर आक्रमण करणाऱ्या प्रत्येकाला हे माहिती होते कारण तुम्ही ज्यांना ईश्वर मानता त्यांना खंडीत करून तुमच्यावर राज्य करू शकतो हे दाखवण्यासाठी केले जातो. भारतीय समाजाचा तेजोभंग करून आत्मभान हरवलेले तर लोकं गुलामीत जातात. तसेच संघर्ष झाला तर त्याचा इतिहासात दाखला दिला जातो. भारताची संस्कृती, सभ्यता जगात सर्वश्रेष्ठ आहे. अलीकडच्या काळात डीएनए टेस्टिंग पुढे आली आहे. या थिअरीला तंत्रज्ञानानं महत्त्व दिलं आहे. बंगालमधील ब्राम्हण, दक्षिणेतील नायर, यूपीतील दलित समाजातील बांधव यांचा डीएनए एकच आहे. जगातील सर्वात जुनी संस्कृती भारतीय संस्कृती आहे. आपल्यापेक्षा जुनी भाषा जगात कुठेही नाही. आम्हाला दुसऱ्याचा विचार घेण्याची आवश्यकता नाही. कुठल्याही विषमतेच्या विषवल्लीशिवाय एक भारतीय समाज म्हणून जगासमोर जावू तेव्हा भारताला कुणीही रोखू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.