औरंगाबाद : तुमचे आरक्षण काढून घेतले जाईल, तुम्हाला या देशातून बाहेर काढले जाईल, असे फुटीरतेचे बीजारोपण काही राजकीय पक्ष मतासाठी करीत आहेत. या देशाची संस्कृती जतन करणाऱ्या व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान देणाऱ्या अदिवासी, वनवासी बांधवांनी बुद्धिभेद करणाऱ्या आणि फुटीरतावादी विचारधारेपासून सावध राहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
औरंगाबाद येथील अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न देवगिरी कल्याण आश्रमाचे वतीने कार्यकर्त्यांच्या महासमेलनाच्या उदघाटनप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, वनवासी म्हणजे मागासलेले असे म्हटले जाते. मात्र, या देशावर झालेले अनेक हल्ले परतविण्यासाठी या वनवाशांनी जिवाची बाजी लावत सशस्त्र लढा दिला असल्याचे ते म्हणाले.
तर स्वातंत्र्यलढ्यात वनवासींचे योगदान मोठे आहे. अनेक हल्ले होत असताना त्यांनी आपली संस्कृती, बोली भाषा जतन करून ठेवली. पर्यावरणाला, निसर्गाला मित्र मानून जीवन जगत आहे. खऱ्या अर्थाने वनवासी हे मागासलेले नव्हे तर विचाराने प्रगत आहेत. मात्र, याच देशात या वनवासींना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यात आले असल्याचेही फडणवीस म्हणाले.
देशाच्या मुख्य प्रवाहात आणल्या शिवाय आदिवासी, वनवासी समाजाची प्रगती होणार नाही. या समाजाची प्रगती झाली नाही तर देशाची प्रगती होणार नाही. तर देशात नक्षलवादी, माओवाद्यांनी सर्वात जास्त हत्या वनवासींच्या केल्या आहेत. देशात फूट पाडणाऱ्या आणि तुकडे करू पाहणाऱ्या लोकांना थांबवायचे असल्यास तंट्या भिल्ल आणि बिरसा मुंडांचा इतिहास देशातील शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायला हवा, असेही त्यांनी नमूद केले.