उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार करून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपाने सरकार स्थापन केल्याच्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच जाहीर झालेला एक सर्व्हे, वृत्तपत्रांमध्ये आलेल्या जाहिराती आणि शिंदेंची शिवसेना आणि भाजपामधील काही नेत्यांनी केलेली विधाने यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेदा निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, आज पालघर येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले आहेत. मात्र तत्पूर्वी एकाच हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या कारमधून प्रवास केल्याने दोन्ही नेत्यांमध्ये मदभेदांची दरी रुंदावल्याचा दावा माध्यमांकडून करण्यात येत होता. मात्र या सर्व चर्चांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा. पण आता गेल्या वर्षभरात अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
पालघर येथील कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मगाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो. तेव्हा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतं. मी सांगू इच्छितो की, आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण आता गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही. तो कालही सोबत होता. आजही सोबत आहे आणि पुढेही राहील. कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्चा तोडण्यासाठी नाही, आम्ही पदं मिळवण्यासाठी सरकार स्थापन केलेलं नाही. तर हे जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे म्हणून हे सरकार स्थापन केलं आहे, असे फडणवीस म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितलं की, मला असं वाटतं. एखाद्या जाहीरातीमुळे, एखाद्या वक्तव्यामुळे या सरकारमध्ये काय होईल, एवढं तकलादू सरकार हे नाही. हे जुनं सरकार नाही. कुणी आधी भाषण करायचं कोणी नंतर म्हणून एकमेकांची गच्ची पकडणारे आम्ही बघितलेत. हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. सामान्यांच्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत हे सरकार कायम राहील, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.