Devendra Fadnavis Birthday, Seva Din: रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. सेवा दिनाच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी राज्यभर पूरग्रस्त नागरिकांना सहाय्य करतील, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
कधीपर्यंत चालणार सेवादानाचे कार्य?
फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय सेवेसाठी पक्षातर्फे राज्यात ५० हजार रुग्णमित्र नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. सेवा दिनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना अन्न वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त स्थिती असेपर्यंत आरोग्यसेवेचा व अन्य उपक्रम चालू राहणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
५० हजार कार्यकर्ते सहभागी होणार
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णमित्र उपक्रमाचा प्रारंभ केला जाणार आहे. पक्षाचे ५० हजार कार्यकर्ते २२ जुलै २०२४ पर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या वैद्यकीय गरजांच्या पूर्ततेसाठी काम करणार आहेत. २८ हजार ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक आणि शहरी भागात प्रभागात एक असे ५० हजार कार्यकर्ते रुग्णमित्र म्हणून काम करणार आहेत. या अभियानाच्या संयोजकपदी डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी सरकारने तसेच राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध आरोग्य विषयक योजनांचे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हे रुग्णमित्र काम करणार असल्याचेही बावनकुळेंनी सांगितले.