मुंबई – आम्ही मतांचे राजकारण कधीही करत नाही. आम्हाला देश महत्त्वाचा आहे. अमरावती, नांदेड, मालेगाव हा फक्त ट्रेलर होता. देशात अराजकता निर्माण करण्यासाठी अल्पसंख्याकांना भडकवलं जात आहे. जी घटना घडलीच नाही त्याबद्दल चुकीचं वातावरण निर्माण करुन दंगल घडवली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल केली जात आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
भाजपाच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले की, २६ ऑक्टोबरला बांग्लादेशातील हिंदुवरील अत्याचाराच्या निषेधार्थ त्रिपुरात रॅली निघते. त्यात कुठेही हिंसाचार झाला नाही. मात्र सोशल मीडियावर सीपीआयएमच्या कार्यालयाला आग लागली तो फोटो दाखवून मस्जिदीला आग लागल्याचं सांगितले गेले. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून त्यावर हिंदू मोठ्या प्रमाणात त्रिपुरात मुस्लिमांवर हल्ला करत आहेत असं सांगितले जाते. देशात चुकीचं वातावरण करायचा प्रयत्न होत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच हे जे काही षडयंत्र उघडं होऊ नये म्हणून नवाब मलिकांना पुढे करून बचाव केला जात आहे. पैसे कुठून कसे आणि कुणाला दिले याची सगळी माहिती सरकारला असल्यामुळे मलिकांना पुढे करुन विषय भरकटवला. आझाद मैदानात ज्यावेळी अशा प्रकारची घटना घडली तेव्हा पोलीस जखमी झाले. एसआरपीएफच्या ५ जवानांना गंभीर जखमी केले ते कोण होते? ज्या परिसरात दंगल झाली तिथं दगडं आली कशी? पोलीस जवानांवर हल्ला झाल्यानंतरही एकालाही अटक झाली नाही. ठरवून पोलिसांवर हल्ला केला गेला. या देशात मोदींच्या विकासाला उत्तर देता येत नाही तेव्हा लोकांमध्ये गोंधळ निर्माण करा. अल्पसंख्याकांना पुढे करुन प्रयोगभूमी सुरु आहे. महाराष्ट्रात हाच प्रयोग आहे. राज्यात त्यांचे सरकार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिवसेनेला वोटबँकेची चिंता
आगामी काळात आपला बुलंद आवाज यायला हवा. आपले जुने मित्र हिंदुत्व सोडत असतील, त्यांना मुंबई महापालिकेची चिंता आहे. मराठी, अमराठी शिवसेनेला मतं देणार नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची वोटबँक मिळावी म्हणून त्यांच्यासोबत गेले आहे. आम्ही लांगुनचालन करणार नाही. निवडणूक येतील आणि जातील पण आमचा देश महत्त्वाचा आहे. परंतु सत्तेसाठी भाजपा कधीच अशा लोकांशी हातमिळवणी करणार नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला(Shivsena) लगावला.