मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोट्यवधीच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान, हिंसाचारादरम्यान, मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी तिकडे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकारने पावले उचलली असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिक्ष्ण घेत आहेत. मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यापासून ते तणावाखाली आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून त्यांची विचारपूस केली. तसेच त्यांनासर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांनी मणिपूर पोलीस महासंचालकांशी संपर्क साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही मणिपूर सरकारशी संपर्क साधला. तसेच या विद्यार्थ्यांना परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत सुरक्षित वातावरणात ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना तिथे सुरक्षित वातावरणात राहता येईल. त्याबरोबरच या विद्यार्थ्यांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्याची सुद्धा व्यवस्था महाराष्ट्र सरकारच्यावतीने तत्काळ केली जात आहे. महाराष्ट्र सरकार सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, अशीही माहिती देण्याता आली आहे.