लातूर : महाराष्ट्रातील एकाही मंत्र्याला अजून स्वत:चा प्रभाव पाडता आला आहे काय?मराठवाडा दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही ‘शाश्वत’ विकास करू, असे अवघड शब्द वापरून फसवणूक करीत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दर शनिवारी-रविवारी नागपूर दौरा करणारे फडणवीस महाराष्ट्राचे नव्हे, तर फक्त नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केली. दुष्काळ पाहणी दौऱ्यानिमित्त येथे आलेल्या राणे यांनी, मी मुख्यमंत्री होतो. मला त्या पदाची ताकत माहीत आहे, परंतु विद्यमान मुख्यमंत्र्याला माहिती नाही. ते बोलण्यात माहीर आहेत. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी हे सरकारचे डोळे आहेत. परंतु अर्ज करूनही प्यायला पाणी मिळत नाही, जनावरांना चारा नाही. १० महिन्यांत सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. सरकारकडे डोळसपणा लागतो, असे सांगितले. आठ दिवसांत सरकारने मदत केली नाही तर काँग्रेस व राणे शेतकऱ्यांना मदत करतील, असे त्यांनी सांगितले. निवडणुका पाहून बिहारला मदत करताना मराठवाड्यातील दुष्काळ कसा दिसत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.पाटलांनी बोध घ्यावा !गुजरातमध्ये पटेल समाज आरक्षणासाठी एकजुटीने पेटून उठला आहे़ महाराष्ट्रातील पाटलांनी (मराठा समाज) गुजरातच्या एकजुटीचा बोध घेऊन आरक्षणासाठी पेटून उठावे, असे आवाहनही त्यांनी केले.
देवेंद्र फडणवीस नागपूरचे मुख्यमंत्री !
By admin | Published: August 27, 2015 1:56 AM