Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. अशातच गेल्या महिन्यात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत व्होट जिहादचा उल्लेख केला होता. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी १४ जागांवर फडणवीस यांनी व्होट जिहाद झाल्याचं म्हटलं होतं. मात्र आता लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा सामना करावा लागला का याची आकडेवारी समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीसांचा व्होट जिहादचा दावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या पराभवासाठी व्होट जिहादला जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांना भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांविरुद्ध एकत्रित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचा दावा देवेंद्र फडणीवस यांनी केला होता. मात्र आता मतदानाची आकडेवारीतून वेगळीच माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारसंघातल्या अर्ध्याहून अधिक जागांच्या मतदानात वाढ झाल्याचे समोर आलं आहे.
महायुतीची मुस्लिम मते वाढली
मतमोजणीच्या आकडेवारीतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दाव्यापेक्षा वेगळी माहिती समोर आली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुतीला लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा मोठा भाग असलेल्या ३८ विधानसभा मतदारासंघापैकी निम्म्याहून अधिकांमध्ये जास्त मते मिळवली आहेत. २० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले महाराष्ट्रात विधानसभेचे ३८ मतदारसंघ आहेत. यापैकी २० मतदारसंघात भाजप आणि मित्रपक्षांची लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवल्याचे आकडेवारीतून समोर आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा जागांपैकी या ३८ मतदारसंघांमध्ये मुस्लिम लोकसंख्या २० टक्के आहे. त्यातील नऊ मतदारसंघामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण ११.२४ कोटी लोकसंख्येपैकी १.३ कोटी मुस्लिम आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या ३८ जागांपैकी भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसने तीन आणि समाजवादी पार्टीने एआयएमआयएमने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
या ३८ जागांवर मुस्लिम नागरिकांची संख्या जास्त असूनही, सध्याच्या विधानसभेत असलेल्या एकूण १० मुस्लिम आमदारांपैकी फक्त आठच या मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या १० मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि सपा यांनी प्रत्येकी दोन जागा तर एआयएमआयएम आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांनी महायुतीच्या विरुद्ध मुस्लिम मतांच्या एकत्रीकरणाचा फटका बसल्याचे म्हटलं. याला भाजप नेत्यांनी व्होट जिहाद असे म्हटलं होतं.
महत्त्वाची बाब म्हणजे, लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार असलेल्या ३८ पैकी २० विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या रावेरमध्ये भाजपची सर्वाधिक २०.१३ टक्के मते वाढली आहेत. दुसरीकडे, मानखुर्द, भिवंडी पश्चिम, भायखळा, छत्रपती संभाजीनगर मध्य, अकोट, परभणी आणि बीड या मतदारसंघामध्ये महायुतीच्या मतांची टक्केवारी १० टक्क्यांनी घटली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुका वगळता भाजपने महाराष्ट्रात सर्व जागा लढवल्या तेव्हा ३८ मुस्लिमबहुल मतदारसंघांकडे फारसे लक्ष दिले नाही. २०१९ मध्ये भाजपने ३८ पैकी फक्त १८ जागा लढवल्या आणि उरलेल्या शिवसेनेसह मित्रपक्षांना सोडल्या होत्या.