Maharashtra Foreign Investment : देशातील एकूण गुंतवणूकीच्या ५२. ४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सोशल मिडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या आठ राज्यांच्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा खोटा असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच २०२४-२५ या आर्थिक वर्षातील परकीय गुंतवणुकीचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२.४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये राज्यात ७०, ७९५ कोटींची परकीय गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावा हा बोगस असल्याचे म्हटलं आहे.
"हे सगळं बोगस आहे. असं काहीही नाहीये. हे सगळं कागदावर आहे. सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेत. भाजपशासित राज्यात गेलेत. कागदावर महाराष्ट्राराला पहिल्या क्रमांकावर दाखवलं जात आहे. तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहचवलं आहे. आता गुजरात पुढे गेला आहे. केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्राला ११ व्या क्रमांकावर नेऊन ठेवलं आहे. ही काय अवस्था करुन ठेवली महाराष्ट्राची?," असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
"विजय वडेट्टीवारांनी अजूनही अर्थमंत्री म्हणून काम केलेलं नाही. त्यामुळे त्यांना त्याबद्दलचे कळणार नाही," असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.