मुंबई - विधानसभेतील आजचा दिवस कोपरखळ्यांनीच गाजला. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेसनेते नाना पटोले तर विरोधीपक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. या दोन्ही नेत्यांच्या अभिनंदनप्रसंगी सभागृहात अनेक गंमतीदार किस्से घडले. यावेळी विरोधीपक्ष नेते फडणवीस यांना पुन्हा एकदा 'शोले' चित्रपट आठवला. त्यांनी स्वत:ची तुलना 'शोले चित्रपटातील नायक धर्मेंद्रशी केली. तर सत्ताधारी नेत्यांची तुलना अमिताभ बच्चनशी केली.
देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून विरोधीपक्षनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी फडणवीस यांच्यावर सभागृहातील नेत्यांकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सत्ताधारी नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह फडणवीसांचे कौतुक करत टोलेही लागवले. या टोल्यांना फडणवीसांनी मजेशीर उत्तर दिले.
माझी अवस्था शोले चित्रपटातील धर्मेद्र सारखी झाली आहे. अमिताभ बच्चन जेव्हा धर्मेंद्रचं लग्न ठरविण्यासाठी जातो, त्यावेळी तो आपला मित्र धर्मेंद्रचं कौतुक करतो. पण त्यात त्याचा उद्देश लग्न मोडणे हाच असतो. त्याच पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडून माझे कौतुक करण्यात आले आहे. असो. लोकशाही आहे. तो तुमचा अधिकार आहे, असल्याचं फडणवीसांनी नमूद केले.
याआधी फडणवीसांनी शोले चित्रपटातील जेलरची आठवण करून देत शरद पवारांवर टीका केली होती. नेते पक्ष सोडत असल्यामुळे पवारांची अवस्था शोलेतील जेलरसारखी झाले आहे. आधे इधर जाओ आधे उधर जावो बाकी मेरे पिछे आओ, असा टोला फडणवीसांनी पवारांना लगावला होता. त्यामुळे फडणवीसांना दुसऱ्यांदा शोले चित्रपट आठवल्याचे दिसून आले.