मुंबई : सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, ते स्वता:च पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. तुम्ही तिघे एकत्र आहात ना? तुम्हाला कळून जाईल जनता आजही कुणाच्या बाजूने आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघडी सरकारवर केली आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या विजयाची सुरूवात नवी मुंबईपासून होईल. औरंगाबाद महापालिकेवर सुद्धा भाजपाचाच झेंडा फडकेल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे विजयी अभियान असेच सुरू राहील. तर आपल्याला धर्मासाठी लढायचे आहे. जे अधर्माच्या सोबत आहेत, ते जुने मित्र असेल तरी त्यांच्याविरोधात सुद्धा लढावे लागेल, असा टोला त्यांनी शिवसेनेला यावेळी लगावला.
तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, त्यांच्या वंशजांचा अपमान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान. पण शिवसेना गप्प आहे. शिवसेनेत हिम्मत असेल त्यांनी 'शिदोरी' मासिकावर बंदी टाकून दाखवावी. आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. पण जनतेच्या विरोधातील एकही निर्णय खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. सरकारमध्ये बसलेले चिंतामुक्त झाले, पण आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तसेच महिलांवर प्रचंड अन्याय होत असताना सरकार गप्प आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात 22 फेबुवारीला राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असल्याचे सुद्धा यावेळी फडणवीस म्हणाले.