नागपूर - मी मुर्खांना उत्तर देत नाही. पण मला नागपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्राने त्यावेळचा अंक पाठवला. तुम्ही कारसेवेला गेला होता तेव्हा आमच्या फोटोग्राफरने काढलेला हा फोटो आमच्या संग्रही होता. तो फोटो मला पाठवला. त्यामुळे मी आभार मानत मी ते ट्विट केला. त्या फोटोमुळे तेव्हाच्या परिस्थितीची आठवण झाली. त्यातून मी फोटो ट्विट केला. त्यामुळे हे काही ट्विट कुणाला उत्तर देण्यासाठी नाही असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
फडणवीसांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो अपलोड केला होता. त्यात फडणवीस कारसेवेला जाताना दिसतायेत. मात्र या फोटोवर राऊतांनी टीका केली. त्यावर पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी उत्तर देण्याच्या भानगडीत पडणार नव्हतो, कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं होते. ज्या लोकांनी राम खरेच त्याठिकाणी जन्माला आले होते का असा प्रश्न विचारला होता. जे खरेच रामाला मानायला तयार नाहीत त्यांना मी कशाला उत्तर देऊ. त्यामुळे मी मुर्खांना उत्तर देत नाही. मी माझ्या आनंदासाठी हा फोटो ट्विट केला असं त्यांनी सांगितले.
तसेच संपूर्ण देश राममय झालेला आहे. मी एक रामभक्त आहे, कारसेवक आहे. मीदेखील राममय झालेलो आहे. फेब्रुवारी महिन्यात मी रामसेवेसाठी अयोध्येला जाईन. आम्ही म्हणजे सगळेच जाऊ असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
अख्ख्या देशाला माहित आहे तेव्हा शिवसेनेचे कार सेवक अयोध्येत उपस्थित होते. शिवसेनेच्या सहभागावर प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद आहे. अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान होते. त्यातल्या कार सेवकांचा आम्ही उद्या सत्कार करणार आहोत. तसेच आमच्यावर त्यावेळी झालेल्या कारवाया याबाबत पोलीस ठाण्यातील सगळं आमच्याकडे आहे. तमचे लोक तेव्हा पळून गेले होते, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जबाबदारी घेतली होती यापेक्षा मोठा पुरावा मोठा काय असू शकतो असं म्हणत राऊतांनी फडणवीसांच्या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
"तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत ते आमच्याकडे मशिदीच्या घुमटावरील फोटो आहेत. तुम्ही स्टेशवर फिरायला गेला असाल, असा टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. अयोध्ये प्रश्नी सर्वांचे योगदान आहे. मला त्याविषयी वाद नाही करायचा. त्यावेळी शिवसेनेतील सर्व खासदार तिथे उपस्थित होते. आम्ही उद्या नाशिकमध्ये एक प्रदर्शन ठेवले आहे, यात सर्व फोटो ठेवणार असून कार सेवकांचा सन्मानही करणार आहे,सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवणार आहे. उद्या प्रत्यक्ष त्या कार सेवकांना भेटा असंही संजय राऊत म्हणाले.