मुंबई: उद्या म्हणजेच 17 ऑगस्टपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. अधिवेशनात यंदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाडंगी पाहायला मिळेल. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनीमहाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत महत्वाची माहिती दिली.
'मविआ सरकारचे निर्णय स्थगित केले नाही'महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकार स्थगिती देत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्याबाबाबत बोलताना कोणत्याच निर्णयांना स्थगिती दिली नसल्याचे फडणवीसांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आम्ही कुठल्याही निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. आम्ही फक्त त्या निर्णयांचे पुनरावलोकन करत आहोत. कारण 100 रुपये गरज आहे तिथे 500 रुपये वाटले गेले आहेत. त्यामुळे आम्ही त्याची माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ. जनतेच्या हिताचे निर्णय हे सरकार घेणार आहे,' असे फडणवीस म्हणाले.
संबंधित बातमी- 'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डालवून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
'लवकर शेतकऱ्यांना मदत मिळेल'ते पुढे म्हणाले की, 'मागच्या सरकारने जाहीर केलेली मदत आणि मिळालेली मदत यात 9 महिन्याचे अंतर होते. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतला. पुरवणी मागण्या झाल्यानंतर आम्ही मदत द्यायला सुरुवात करू. आम्ही आताही मदत देऊ शकतो, पण 95 टक्के पंचनामे झाले आहेत, 5 टक्के बाकी आहेत. काही ठिकाणी पंचनाम्याबाबत तक्रारी आहेत, त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचेल,' असंही फडणवीस म्हणाले.
'मविआ बेईमानीचे सरकार'पत्रकार परिषदेत मविआ सरकारवर टीका करताना फडणवीसांनी दोन्ही सरकारमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. ते म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले. फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही, तर सर्वच क्षेत्रासाठी मविआ बेईमानीचे आणि नुकसानीचे सरकार होते. जनतेचा कौल डालवून ते सरकार स्थापन झालं होतं. पण, आता विधानसभा निवडणुकीत ज्यांनी एकत्रित येऊन मते मागितली होती, ते दोन पक्ष आज सत्तेत आले आहेत,' असं फडणवीस म्हणाले.