२०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचे तिकीट देण्याचा शब्द देऊनही तो पाळला नाही. बावनकुळेंच्या १०० आले तर ५ जातील आणि ९५ राहतील या वक्तव्यानंतर भाजपात आपली गरज राहिली नाही, असा आरोप करत गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपाला रामराम केला आहे. कुथे हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.
रमेश कुथे हे शिवसेनेत असताना गोंदियाचे आमदार होते. सहा वर्षांपूर्वी कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता. २०१९ मध्ये पक्ष प्रवेश करताना आमदारकी देण्याच्या आश्वासनावर त्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिले होते. पण पूर्ण केले नाही. पक्षात नवीन लोक येतात त्यांना सन्मान मिळत नाही, असा आरोप कुथे यांनी केला आहे.
नागपूरच्या देशपांडे सभागृहात पूर्व विदर्भाताल सर्व लोकसभेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सगळ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले होते. येणाऱ्यांच्या मागण्या ही आहेत. जे येतात त्यांना हो बोला, जे मागतात त्यांना हो बोला. पण आपण सर्वांना खुश करू शकत नाही. 100 येतील आणि पाच परत जातील. ते पाच गेले तरी आपण 95 ने पुढेच राहू असे बावनकुळे म्हणाले होते. त्या दिवशी मला असे वाटले की या पक्षामध्ये आपली काही गरज नाही, असे कुथे यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पार्टी ही ओबीसींच्या विरोधात आहे. त्यांच्या हिताचे काही बोलत नाही. मराठा युद्ध असो, ओबीसी युद्ध असो हे दोघेही तव्यावर हात ठेवतात. नाना पटोले माझ्या घरी आले होते तेव्हा माझे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. ते म्हणाले की, आमच्या सोबत या. मी म्हणालो विचार करतो आणि सांगतो. कार्यकर्त्यांची इच्छा होती लवकरात लवकर भाजप पक्षाला तुम्ही सोडा. यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. माझे शिवसेनेवर प्रेम आहे आणि मी त्यांच्या भुमिकेवर काही बोलू शकत नाही, असेही कुथे म्हणाले.