मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळातील अडचणी, नंतरच्या काळात अपेक्षित उपाययोजना याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विविध उद्योजकांशी चर्चा केली.
या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयनका (आॅटोमोबाईल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रूईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग), रहेजा समूहाचे रवी रहेजा (हॉस्पिटॅलिटी, आयटी, रिटेल), सिद्धार्थ रॉय कपूर (चित्रपट निर्मिती), रियाझ अमलानी (हॉस्पिटॅलिटी अँड रेस्टॉरंट), नमन समूहाचे जयेश शाह (हॉटेल्स आणि पायाभूत सुविधा), वेल्सस्पन बी. के. गोयनका (वस्त्रोद्योग आणि पायाभूत सुविधा), एल अँड टीचे अनुप सहाय (पायाभूत सुविधा, वीज, संरक्षण), फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी (फूड सर्व्हिसेस), बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड (अन्नप्रक्रिया, सेवा) आदी सहभागी झाले होते. चर्चेनंतर फडणवीस यांनी सांगितले की, हे संवादसत्र अतिशय अभ्यासपूर्ण झाले आणि यातून आपल्यालाही अनेक नवीन बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. प्रत्येक क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी सारे मिळून सामूहिक प्रयत्न करू.