मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार आजारपणामुळे गैरहजर राहिले खरे, परंतू त्यानंतरच्या घडामोडींनी वेगळ्याच राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बैठकीनंतर काही कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. ट्रिपल इंजिन सरकारमधील एका नाराज इंजिनने देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मी जेव्हा जेव्हा संसदेत भाषण देते तेव्हा तेव्हा माझ्या नवऱ्याला नोटीस येते. माझा नवरा आणि मी त्या नोटीसला लव्ह लेटर म्हणतो. नाती तोडायला वेळ लागत नाही नाती जपावी लागतात. आम्ही नाती जपणारे आहोत. मला पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राचा आवाज व्हायचे होते म्हणून मी पक्षाकडे लोकसभेचे तिकीट मागितलेले, असे सुळे म्हणाल्या.
गेल्या नऊ वर्षात भाजप सरकारने शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याचे काम सुरू केले आहे. आज अतिशय असंवेदनशील सरकार देशात आहे. ज्या दिवशी केंद्रात इंडियाचे सरकार येईल त्यादिवशी अंगणवाडी सेविकांना 25 हजार मानधन देऊ. आमचं सरकार आल्यावर आम्ही सिलेंडरचे भाव कमी करू हे रेकॉर्ड करून ठेवा. आजनंतर भाजपने आम्हाला भ्रष्ट म्हणू नये, पक्षाला जन्म पवार साहेबांनी दिला, चिन्ह आणि पक्ष आम्ही नेणार हे अजित पवार गटाला कसं कळतं, याचा अर्थ दिल्लीचा अदृश्य हात यांना ही माहिती देतो, अशी टीका सुळे यांनी केली.
राज्य सरकारच्या तीन इंजिनामधील एक इंजिन नाराज असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे, असे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच अजून हनिमूनही संपला नाही, तीन महिन्यात हे कसे काय नाराज झाले असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मेळाव्याला संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस हे काही वेळापूर्वी भाजपाच्या एका कार्यक्रमाला हजर होते. परंतू, त्यांच्या ठरलेल्या वेळेपूर्वीच फडणवीस यांनी भाषण केले आणि दिल्लीला निघाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीक़डे अजित पवारांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीचे नेते जमू लागल्याचे दिसत आहे.