नवी मुंबई - हा वैश्विक कल्याणाचा विचार हाच आपला खरा महाराष्ट्र आणि यासोबतच आपली मराठी भाषा आणि संस्कृतीही जोडली गेली आहे. मराठी भाषेला वैश्विक बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मराठी भाषा संवर्धनासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनाला फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी उपस्थिती दर्शविली. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्राला अनेक महान व्यक्तींची परंपरा लाभली आहे. या महान व्यक्तींनी विविध क्षेत्रात केलेले काम हाच महाराष्ट्र धर्म होय. हाच धर्म घेऊन जगणारा मराठी माणूस या वैश्विक गुणामुळे जगाच्या पाठीवर सर्वत्र दिसतो. म्हणूनच महाराष्ट्र सर्व जगात दिसतो, असे स्पष्ट करून रशिया, जपान, मॉरिशस या देशांमध्ये गेल्यानंतर मराठमोळ्या पद्धतीने झालेल्या त्यांच्या स्वागताची आठवण फडणवीस यांनी यावेळी सांगितली. मराठी भाषा जगातील एक समृद्ध भाषा आहे.
या भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या भाषेकडे पूर्वजांचा हजारो वर्षांचा विचारांचा ठेवा आहे आणि हा ठेवा पुढच्या पिढीला देणे, ही काळाची गरज आहे. इंग्रजी व्यवहार भाषा असली तरी आपण आपल्या मुलांशी मात्र मराठीतच बोलायला हवे. प्रमाण भाषा महत्त्वाची तर आहेच; परंतु, याचबरोबर बोली भाषेचा गोडवाही जपायला हवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी मराठी भाषा व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, मराठी आंतरराष्ट्रीय मंचचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात मराठीला टिकवण्यासाठी करावी लागते धडपड : राज ठाकरे- महाराष्ट्रात मराठीलाच टिकवण्यासाठी धडपड करावी लागत असल्याची खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र मंडळाकडून अमेरिकेत शंभरहून अधिक मराठी शाळा चालवल्या जात असल्या तरीही सर्वप्रथम राज्यात लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्र शासनातर्फे वाशीत आयोजित विश्व मराठी संमेलनासाठी ते रविवारी उपस्थित होते. -हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नसून इतर भाषांप्रमाणेच एक भाषा आहे. ती केवळ केंद्र आणि राज्ये यांच्यात समन्वयासाठी वापरली जाते. तर, कोणत्याच भाषेची राष्ट्रभाषा म्हणून निवड झालेली नाही, परंतु आपण मात्र गोट्यासारखे दुसऱ्या भाषेकडे घरंगळत जात असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला.