मोदींनीच साथरोग कायदा लागू केला होता. बीएमसीची ईडी चौकशी करायची असेल तर खुशाल करा. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कुणी दुसरा घेतो का? आज मुंबईत अधिकाऱ्यांवर धाडी टाकल्या जातायत, पण लोकप्रतिनिधींच्या घोटाळ्यांचे काय झाले? नवाब मलिक यांच्यावर ज्या कायद्यांखाली कारवाई झाली, राधाकृष्ण विखे पाटलांवर कधी करणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पीएम केअर फंडाला टाटाने एक रकमेने दीड हजार कोटी दिले होते. त्या पीएम केअर फंडाची देखील चौकशी करा. पण पीएम केअर फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. मग पीएमचा अर्थ काय हास्यजत्रेतला प्रभाकर मोरे केअर फंड आहे का? कशासाठी लोकांनी पैसे दिले. भाजपाच्या दलालांनी, लोकप्रतिनिधींनीसुद्धा तेव्हा महाराष्ट्रात नाही पीएम केअरला पैसे दिलेले. तुम्ही आमची चौकशी जरूर करा, पण आम्ही सुद्धा तुमच्यावर करू. ईडी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांवरही धाडी टाका. हजारो कोटी कुठे गेले याचा प्रश्न विचारला तर कारवाई केली जाते, पण उत्तर काही मिळत नाही, असे ठाकरे म्हणाले.
कोरोनाकाळात मोदींनी नुसत्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. ऑक्सिजन देताना काय काय घडले ते सर्वांना माहिती आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. अनेकांच्या गोष्टी अनेकांकडे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एक लक्षात ठेवावे कुटुंब तुमच्याकडेही आहे. उद्धव ठाकरे खलनायक आहे की नाही जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहिती आहे. सूरज चव्हाण साधा शिवसैनिक आहे, असे ठाकरे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. हे गुजरातमध्ये बसून महाराष्ट्र लुटतायत. संपूर्ण जगामध्ये मुंबई मॉडेलचे कौतूक झाले, पण या नालायकांना मुंबई बदनाम करायचीय. अमेरिकेत यांच्याविरोधात निदर्शने होतायत. ते बराक ओबामा देखील बोललेत. आता कुठे गेला माय फ्रेंड बराक? आता ते म्हणतील आंतरराष्ट्रीय कट आहे मोदी विरुद्ध जग असे बोलतील. मी तर साधा आहे. काल ते नड्डा ओरिसामध्ये गेले तिथे उद्धव ठाकरेवरून बोलले, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
महबुबा मुफ्तींसोबत बसलो तर गुन्हा आहे का? फडणवीसांनी मी महबुबा मुफ्तींसोबत बसलो म्हणून माझ्यावर टीका करत आहेत. मोदी, शहांचे फोटो माझ्याकडे आहेत. नवाझ शरीफ यांच्याकडे मोदी केक खायला गेले होते. मी काल मुद्दाम मुफ्तींच्या शेजारी बसलो. कारण त्या भाजपाच्या लाँड्रीतून स्वच्छ झाल्या आहेत. काल बेंबीच्या देठापासून ओरडत होता, मग तुम्ही बसलेला तेव्हा फडणवीस तुमचे हिंदुत्व सुटले होते का? आमचे कसे सुटेल. तुम्ही केले तर चालते आणि आम्ही केले तर गुन्हा ठरतो का, असा सवाल ठाकरे यांनी फडणवीस यांना केला. काश्मीरमध्ये अजून निवडणुका का घेतल्या नाहीत. ३७० कलम हटविण्याचा भाजपाने मुफ्तींना ऑफर दिलीय. असा दावा ठाकरे यांनी केला.
आम्ही काँग्रेससोबत गेलो आम्ही हिंदुत्व सोडण्याचा आरोप होतो, तेव्हा मी तुमचे उदाहरण देतो. तेव्हा त्या म्हणाल्या हो मी ऐकलेय. तेव्हा मी त्यांना म्हटले ते निर्लज्ज आहेत, ते तुमच्यासोबत आले. तुम्ही त्यांच्यासोबत कशा गेलात, असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की ३७० कलम काढणार नाही असे भाजपाने म्हटले होते. म्हणून मी त्यांच्यासोबत गेले होते, असा खुलासा केल्याचे ठाकरेंनी म्हटले.