देवेंद्र फडणवीस 'सरकारी जबाबदारी' सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:12 PM2024-06-18T12:12:57+5:302024-06-18T12:14:08+5:30
Devendra Fadnavis, BJP Maharashtra Politics: महायुतीला बसलेला फटका आणि निकालाचा आढावा घेण्यासाठी लवकरच दिल्लीत महत्त्वाची बैठक
Devendra Fadnavis, BJP Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानेभाजपाला जोरदार धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकत्र घेऊन 'फिर एक बार ४० पार'चा नारा भाजपाने दिला होता. पण, महायुती २० च्या पुढेही जाऊ शकली नाही. भाजपाचीही पुरती दाणादाण उडाली. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत, "मला सरकारच्या कामातून मुक्त करा आणि पक्षाचं काम करू द्या", अशी इच्छा व्यक्त करणारे देवेंद्र फडणवीस आजही आपल्या त्याच भूमिकेवर ठाम असल्याचं समजतं. दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत होणाऱ्या बैठकीत ते आपला हाच मनोदय पुन्हा बोलून दाखवतील, असं निकटवर्तीयांनी सांगितलं. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह काय भूमिका घेतात, याबद्दल उत्सुकता आहे. महाराष्ट्रात पक्षाची धुरा फडणवीसांकडे देऊन पुढच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपाच्या अपेक्षेनुसार लागला नाही. त्यामुळेच भाजपाची पक्षसंघटना कमकुवत झाली आहे का, असा सवाल राज्यात दबक्या आवाजात विचारला जाऊ लागला. याचदरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, राज्यातील पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. मला उपमुख्यमंत्रिपदातून मुक्त करावे. मला पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे. फडणवीसांच्या या विनंतीला केंद्रातून अद्याप उत्तर आलेले नाही. पण फडणवीस मात्र आपल्या मागणीवर ठाम असल्याने भाजपाने पुढचे प्लॅनिंग करून ठेवले असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका मांडली. या भूमिकेवर अनेक प्रतिक्रिया आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांनीही फडणवीसांनी सत्तेत राहावे असा सल्ला दिला. केंद्रातदेखील यावर चर्चा झाली असून फडणवीसांनी पदावर राहून पक्षसंघटनेचे काम करावे असे सांगण्यात आल्याचे वृत्त आहे. पण असे असूनही फडणवीस मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशा परिस्थितीत फडणवीसांबाबतचा निर्णय हा भाजपाचे पक्षश्रेष्ठी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आहे. मोदी-शाह जोडीने जर फडणवीसांची विनंती मान्य केली तर ते लगेच राजीनामा देतील, असे समजते.
फडणवीस सरकारमधून बाहेर पडल्यास पुढे काय, असा सवाल अनेकांच्या मनात येऊ शकतो. याबाबत भाजपाने प्लॅनिंग करून ठेवले असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे राज्यातील पक्षसंघटन काहीसे कमकुवत झाल्याचे दिसून आल्याने फडणवीस हे भाजपाच्या पक्ष संघटनेसाठी पूर्णवेळ काम करतील असे समजते. अशा परिस्थितीत फडणवीसांना भाजपा प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते, जेणेकरून विधानसभा निवडणुकीला त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपा निवडणुकीला सामोरा जाईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असल्याचे दिसते.
यात आणखी एक ट्विस्ट असा की, देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला समर्थन देत भाजपाचे आणखीही काही वरिष्ठ नेते सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या नेतेमंडळींनीही पक्ष संघनटेसाठी काम करण्याचा निर्णय मनात पक्का केला असल्याचे समजते. त्यात चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, सुधीर मुनगंटीवार यांची नावे चर्चेत आहेत. अनुभवी नेत्यांचा नव्याने पक्षबांधणीसाठी उपयोग करून घेणे आणि भाजपाच्या नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देऊन त्यांना खुश करणे, असा दुहेरी फायदा यातून होऊ शकतो. पण हे सारे काही केंद्रातील पक्षश्रेष्ठींच्या हाती असून फडणवीसांच्या विनंतीला मोदी-शाह मान्यता देणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.