Devendra Fadnavis Latest News: भाजपच्या गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी (४ डिसेंबर) एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री असतील, हे स्पष्ट झाले. निवडीनंतर मनोगत व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्ते, नेत्यांचे आभार मानले. त्याचबरोबर महायुतीचे सरकार असल्याने आणि प्रचंड बहुमत मिळाल्याने चार गोष्टी मनासारख्या, तर चार मनाविरुद्ध होतील, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इच्छुकांना त्याग करण्याची तयारी ठेवण्याचा मेसेज दिला.
देवेंद्र फडणवीस काय बोलले?
गटनेते पदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आपले महायुतीचे सरकार आहे. या सरकारमध्ये एकदिलाने आपल्या सगळ्या मित्रांना सोबत घेऊन आणि प्रसंगी जेव्हा इतकं मोठं बहुमत असतं, त्यावेळी सगळ्या गोष्टी; सगळ्यांच्या मनाच्या आपल्याला पूर्ण करता येत नाहीत."
"आपण एक मोठे उद्दिष्ट घेऊन आपण राजकारणात आलेलो आहोत. केवळ पदांकरिता, केवळ आपल्याला कुणीतरी मोठं करावं, याकरिता राजकारणात आलेलो नाही. त्यामुळे मला या गोष्टीची पूर्ण अपेक्षा आहे, येत्या काळात चार गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील, तर चार गोष्टी विरुद्ध देखील होतील. पण, तरीदेखील एका मोठ्या उद्दिष्टासाठी आपण एकत्रितपणे काम करू", असे म्हणत देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची इच्छा असलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे मेसेज दिल्याची चर्चा यानंतर सुरू झाली.
शपथविधी सोहळ्याला PM मोदींची उपस्थिती
मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्री असा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री म्हणून, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मंत्री म्हणून कोणते आमदार शपथ घेणार याबद्दल मात्र गुप्तता बाळगण्यात आली आहे.