नवी दिल्ली-
राज्याचे गृह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिशा सालियान मृत्यूप्रकरणाची खोटी माहिती दिली असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पदाचा दुरुपयोग करुन सभागृहाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी फडणवीस यांच्यावर सोमवारी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
शिंदे-फडणवीस यांच्यावरील आरोपांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी दिशा सालियान प्रकरण उकरून काढलं जात आहे. सालियानच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली आणि त्याचा सविस्तर अहवाल देखील सादर केला आहे. तरीसुद्धा फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना चुकीची माहिती दिली. त्यांच्याकडून जाणूनबुजून खोटी माहिती देण्यात आली. राज्याच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही सोमवारी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव देणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले.
नागपूर भूखंड प्रकरणी फडणवीसांनीच केलेली याचिकानागपूर न्यास भूखंड प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. पण जे उपमुख्यमंत्री फडणवीस आज शिंदेंची बाजू घेत आहेत खरंतर त्यांनीच याप्रकरणी याचिका दाखल केली होती, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. फडणवीसांना हे प्रकरण पूर्ण माहिती आहे. यात भ्रष्टाचार झाला आहे याची त्यांनाही माहिती आहे कारण त्यांनीच याप्रकरणी याचिका केली होती. पण आज ते मुख्यमंत्र्यांची बाजू घेत आहेत, असं नाना पटोले म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"