पनवेल - आज पनवेल येथे झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी इतर पक्षांमधील घराणेशाही आणि विचारसरणीवर बोट ठेवताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला. जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात. ज्या क्षणी आपण विचार सोडून आपण सत्तेच्या मागे लागू, त्यादिवशी भाजपाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यकारिणीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात झालेले सत्तांतर, शिवसेनेमधील फूट, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यामागची भूमिका, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील छुपी आघाडी या सर्वांवर सविस्तर भाष्य केले. यावेळी घराणेशाही आणि विचारसरणीयाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या पैकी कुणीही भाजपामध्ये सत्ता मिळवण्यासाठी आलेलो नाही आहोत. जेव्हा विचार संपतो तेव्हा पक्ष संपतात. जे पक्ष विचारांवर चालले तोपर्यंत चाललेत, ज्यावेळी विचारांऐवजी ते सत्तालोलूप झाले तेव्हा ते पक्ष संपलेत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनंचं नाव न घेता लगावला.
ते पुढे म्हणाले की, भाजपामध्ये सामान्यातीला सामान्य प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान होऊ शकतो. कारण आपण घराणेशाही मांडणारा पक्ष नाही आहे, एखाद्या नेत्याच्या मुलांनी पक्षात येण्यास आपल्या पक्षात ना नाही. मात्र पक्षावर कुणाचा अधिकार नाही. याच्यानंतर याला दिलंच पाहिजे, अशा प्रकारचा कुठलाही अधिकार भाजपामध्ये नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला मेहनतीच्या आधारावर पुढे यायचं आहे. आज अनेक लोकं आपल्या पक्षात त्या प्रकारे पुढे येताहेत. त्यामुळे ज्या क्षणी आपण विचार सोडून आपण सत्तेच्या मागे लागू, त्यादिवशी भाजपाचा ऱ्हास व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
विचाराने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याग करावाच लागेल. त्यामुळे अनेक लोकं मला विचारतील की त्याग आम्हीच करायचा का, तर त्याग करावाच लागेल. ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.