Devendra Fadnavis Reaction on Rajya Sabha Elections 2022: "राज्यसभेच्या लढाईत भाजपाने बाजी मारली. पण ही छोटी लढाई होती. मोठी लढाई अजून बाकी आहे. येत्या काळात सगळीकडे या सरकारला दणके देऊ. २०२४ ला भाजपा केंद्रात आणि राज्यात सरकार आणेल, यावर मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उत्साह कायम ठेवा. आता सुरूवात झाली आहे. राज्यात आणि मुंबई पालिकेवर भाजपाचा भगवा लावायचाय हे लक्षात ठेवा", अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया दिली. भाजपा कार्यलयाजवळ झालेल्या विजयोत्सवाच्या वेळी ते बोलत होते. त्यावेळी राज्यसभेवर निवडून आलेले खासदार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिघांचेही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे-
- कोल्हापूरचे पैलवान धनंजय महाडिक यांनी शिवसेनेला छोबीपछाड दिला. त्यांचे अभिनंदन!
- मी काल बोललो होतो की आपला विजय लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक यांना समर्पित आहेत. काहीही झालं तरी मतदान करणार या भावनेने ते आले. त्यांच्यामुळे आमची तिसरी जागा आली.
- आपण जिंकल्याने काहींचे तोंडचं पाणी पळालं तर काही पिसाटले आहेत. पण जिंकल्यावर नम्रता सोडायची नसते, त्यामुळे जल्लोष करा पण उन्माद नको.
- शिवसेनेला कोणी मतं दिली नाहीत हे त्यांना खरंच माहिती असेल तरीही ते काही करु शकत नाहीत. कारण भाजपाला मदत करणाऱ्यांवर जर त्यांनी कारवाई केली तर महाविकास आघाडीतील अनेक जण त्यांना सोडून जातील.
- विधानपरिषद निवडणूक पण कठीण आहे. सदसदविवेक बुद्धी स्मरून तेथे भाजपाला जास्त मतदान होईल.
- सरकार व मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायची गरज आहे.
- केवळ भाजपाशी लढायचं म्हणून महाराष्ट्राचं नुकसान महाविकास आघाडी करत आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट. विमा कंपन्यांचा फायदा. सरकार गप्प आहे. शेतमाल खरेदीची अवस्था वाईट आहे.
- राज्यातील प्रोजेक्ट बंद, लोडशेडिंग सुरू आहे. अशा प्रकारे राज्य मागे चाललंय
- बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी राज्यकर्ते आहात लक्षात घ्या. बदल्याचं राजकारण करू नका.
- समाजातील घटकाचा विचार केला जात नाहीये हे खूप खराब राजकारण सुरू आहे.
- मुंबईत घर नसल्याने मी नशीबवान आहे, नाही तर मला नोटीस आलीच असती.
- मोदींच्या कामावर विश्वास ठेवून महाराष्ट्राने सत्ता दिली, पण सत्तेचा अपमान झाला. आता हे सरकार तरी चालवून दाखवा.
- राज्यसभा निवडणुकीसाठी ज्या लोकांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे आभार आणि सर्व टीमचं अभिनंदन