फडणवीसांच्या शुभेच्छा अन् राष्ट्रवादीच्या पोटात गोळा! एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 10:05 AM2022-07-05T10:05:24+5:302022-07-05T10:10:28+5:30
राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली.
मुंबई-
राज्याच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सोमवारी शिंदे सरकारनं बहुमत सिद्ध करत मोठी लढाई जिंकली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदन प्रस्तावात सर्वपक्षीय नेत्यांची भाषणं झाली. यानंतर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याही नावाची घोषणा झाली. विरोधी पक्षनेता म्हणजे शॅडो मुख्यमंत्रीच म्हणून ओळखला जातो. अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाच्या प्रस्तावात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. या भाषणात फडणवीसांनी अजित पवारांच्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलंच, पण एका विधानानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
CM शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, गोंडस नातू स्वागताला; आजोबा-नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग!
फडणवीसांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या पण त्यांनी अजित पवार कायम विरोक्षी पक्षनेते राहावेत असं वाटत नसल्याची इच्छा व्यक्त करुन सर्वांना धक्का दिला. "खरं म्हणजे आपल्याकडे एक पद्धत आहे की विरोधी पक्षनेत्याचं वर्णन करताना तुम्ही खूप चांगले विरोधी पक्षनेते आहात त्यामुळे तुम्ही कायम तिथं राहावं असं म्हटलं जातं. पण मी हे लोकशाहीत मान्य करत नाही. मला असं वाटत नाही. तुमच्या मनात तुम्हाला जिथं जायचं आहे त्याचा प्रयत्न तुम्ही नक्की कराल. त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. दादा तिथं कायम राहावेत असं वाटत नाही. पण जोपर्यंत तुम्ही त्या पदावर आहात त्याला न्याय जरूर द्यावा एवढं मी नक्की यावेळी सांगेन", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आणखी ३-४ आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?
अजित पवार यांच्याबाबत सत्ताधारी पक्षातून ज्यांनी ज्यांनी भाषण केलं त्या सर्वांनीच त्यांच्या कामाचं कौतुक केलं. पण त्यातही फडणवीसांनी केलेल्या कौतुकानं सर्वांचं लक्ष वेधन घेतलं. त्यामुळे फडणवीस आणि अजित पवार यांचं ट्युनिंग उत्तम आहे. हे समीकरण भविष्यात केव्हाही दिसू शकतं असंच चित्र पाहायला मिळाला. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पोटात गोळा आला असेल एवढं मात्र नक्की.
देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांच्या कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांनी सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तसंच अनेकदा मुख्यमंत्रीपदानं हुलकावणी दिल्याचंही नमूद केलं. पहाटेच्या शपथविधीचाही उल्लेख यावेळी फडणवीसांनी केला आणि त्यावेळी जे झालं ते तसंच राहिलं असतं तर अजित पवार देखील नक्कीच अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले असते असंही बोलून दाखवलं. इतकंच नव्हे, तर आजही तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासगीत विचारलं तर अजित पवारांनी जे पाऊल उचललं होतं ते योग्यच होतं असंच तुम्हाला कळेल असा टोला फडणवीसांनी जयंत पाटील यांना लगावला.