Rohit Pawar : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावे लागलं आहे. या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला जबाबदारीतून मु्क्त करावे अशी विनंती केली होती. त्यानंतर आता मंगळवारी दिल्लीत फडणवीसांचा राजीनामा आणि राज्यातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी कायम राहणार हे स्पष्ट झालं. तसेच एनडीएतील पक्षांसोबत विधानसभेसाठी चर्चा करुन भाजप पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र आता शरद पवार गटाने या बैठकीत अजित पवार यांना बाजूला करण्याची रणनीती आखल्याचे म्हटलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील निकालाचे विश्लेषण करताना आरएसएसच्या मुखपत्रानेही अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती असे म्हणत भाजपला फटकारलं होतं. बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती? तसेच अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली अशा शब्दात भाजपवर ऑर्गनायझरमधून ताशेरे ओढण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या टीकेला प्रत्युत्तर देत जनतेच्या भाजपवरील नाराजीचा फटका अजित पवार यांना बसल्याचे म्हटलं. मात्र आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत अजित पवारांना बाजूला काढण्याची रणनीती आखल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येतंय - रोहित पवार
"मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे," असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.
भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही
"परंतु मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी," असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. यासोबत या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग देखील केलं आहे.