Devendra Fadnavis : राज्यातील विविध प्रकल्प हे परराज्यात गेल्यावरुन महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. अशातच महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीने चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार करुन हा प्रकल्प नाशिकऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे.
महिंद्रा अँण्ड महिंद्रा हा प्रकल्प गुजरामध्ये जाणार नसल्याचे स्पष्टीकरण स्वतः महिंद्रा यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. अकोल्यात भाजपच्या महामेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. मविआच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर गेला होता पण पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम महायुती सरकारने केल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वेदांता-फॉक्सकॉन, मुंबईतील मोठा हिरे उद्योग, टाटा-एअरबस असे प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने चीनमधील शानक्सी कंपनीशी कार निर्मितीचा २५ हजार कोटींचा करार केला असून हा प्रकल्प नाशिकऐवजी गुजरातला उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यात केंद्र सरकारच्या मंजुरीचे गौडबंगाल असल्याची चर्चा असून हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेल्यास हजारो नोकऱ्याही गमवाव्या लागणार आहेत, असेही विरोधकांनी म्हटलं होतं.
"आता हे इतके खोटारडे लोक आहे. काल एका विदेशी संस्थेने महाराष्ट्रातील महिंद्राचा उद्योग गुजरातला जाणार असे सांगितले. त्यानंतर लगेच इको सिस्टम सुरु झाली. उद्धव ठाकरे, नाना पटोले याविषयी बोलले. सुदैवाने संध्याकाळी महिंद्रा अँण्ड महिंद्रा यांनीच संध्याकाळी सांगितले की आम्ही कुठेही जाणार नाहीत. याऊलट पुण्यात दहा हजार कोटींची, नाशिकमध्ये २४ हजार कोटींची आणि विदर्भात १२०० कोटींची गुंतवणूक करतो आहोत. आम्ही जी गुंतवणूक करतो आहोत ती महाराष्ट्रात करत आहोत. महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे. हे रोज महाराष्ट्राला बदनाम करतात. रोज इथल्या गुंतवणूकदारांना त्रास देतात. मविआच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर गेला होता. पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केलं," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.