Amit Shah Devendra Fadnavis: महाराष्ट्रात जून अखेरीस मोठी बंडखोरी झाली. शिवसेनेचे वरच्या फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेतेमंडळींकडून विविध प्रतिक्रिया देण्यात येत होत्या. पण भाजपाची नेतेमंडळी मात्र या घटनेबाबत मौन बाळगून होती. अखेर महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने एकत्रित येऊन सत्तास्थापना केली. इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी मानला जाणारा हा सारा प्रकार कसा घडला, यामागचा खरा सूत्रधार कोण, असा अनेक चर्चा मधल्या काळात रंगल्या. याच संदर्भात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुली दिली. देवेंद्र फडणवीस यांनी 'विचार पुष्प' पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात त्याचे कौतुक केले. त्यावेळी ते बोलत होते.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि अमित शाह यांच्या आत्मविश्वासामुळेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात यश आले. अमित शाहंच्या विचारात प्रगल्भता आहे. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि चाणक्य यांना मानणारे ते नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता तर आहेच, पण निर्णय घेण्याची क्षमताही प्रचंड आहे. महाराष्ट्रात झालेला बदल तुम्ही पाहिला आहे. शिवसेनेने आमच्यासोबत जी बेईमानी केली, त्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली. अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आहे," अशी जाहीर कबुली फडणवीस यांनी दिली.
"अमित शहा हे पक्षासाठी समर्पित नेतृत्व आहे. भाजप अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य आपण पाहिले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून यूपीमध्ये त्यांचे कार्य आपण सर्वांनी पाहिले, जिथे भाजपला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या. याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वाला आणि अमित भाईंच्या कार्याला जाते. पक्ष मजबूत करण्यासाठी ते जवळपास देशभर फिरले. प्रत्येक राज्यात त्यांनी अनेक दिवस मुक्काम केला. अमित शाह एका दिवसात ४०-४० बैठका घेऊन कार्यकर्त्यांपासून समाजातील प्रत्येक घटक आणि व्यक्तीपर्यंत पोहोचले. तसेच दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहून त्यांनी या कार्यालयातून निवडणूक प्रक्रिया हाताळली आणि भाजपाचे सरकार आले," अशा शब्दांत फडणवीसांनी अमित शाह यांची कार्यशैली अधोरेखित केली.