मुंबई: किरीट सोमय्या हे मनोरंजन करणारे एक पात्र आहे. अगोदर त्यांचाच पक्ष त्यांना गंभीरतेने घेत नव्हता आणि आता आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी केली. भाजप नेते किरीट सोमय्या हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयात गेले होते. त्यावेळी त्यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी एका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून त्यांनी काही फाईल्स पाहिल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्याच मुद्द्यावर आज मलिकांनी पुन्हा एकदा भाष्य केलं.
"किरीट सोमय्या हे भाजपचे मनोरंजन करणारे पात्र आहे आणि असे मनोरंजन करणारे पात्र राजकारणात असावे आणि त्यांच्याकडून जनतेचे असेच मनोरंजन होत रहावे हीच अपेक्षा. मंत्रालयात येऊन फाईल चेक केल्याचा मुद्द्याबद्दल बोलायचे तर आधी त्यांचाच पक्ष त्यांचा गंभीरतेने विचार करत नव्हता आणि आता आम्हीही त्यांच्या कृतींचा गंभीरतेने विचार करत नाही", अशी खोचक टीका नवाब मलिकांनी सोमय्यांवर केली.
मंत्रालयातील फाईल्स प्रकरणी काय म्हणाले होते सोमय्या?
"मी अनेक फाईल्स पाहिल्या. अगदी सचिन वाझेच्या फाईल्सचीही पाहाणी केली. तिथे सर्व ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती. त्यामुळे त्या सर्वांना सरकार नोटीस देणार का? हा तर इंग्रजांच्या काळातील कायदा होता. तुम्ही तो कायदा परत आणणार आहात का? की आता मंत्रालयात लोकांनी स्वत:ची खुर्ची घेऊन जायची?", असा सवाल या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे आणि किरीट सोमय्या यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. पण भाजपाने या कारवाईवर आक्षेप घेतला आहे. 'सोमय्या अधिकऱ्यांच्या खुर्चीवर बसले म्हणून कारवाई करणं निषेधार्ह आहे. हा मोघलाईचा कारभार सुरू आहे', अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे.