Mohit Kamboj Warning: एकनाथ शिंदेंसह एकूण ३९ आमदारांनी शिवसेनेविरोधात व महाविकास आघाडीविरोधात बंड पुकारल्याने अखेर २९ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव यांच्या राजीनाम्यासह महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. आता एकनाथ शिंदे गटाच्या साथीने भाजपाचे सरकार राज्यात स्थापन होईल अशी चर्चा आहे. याच दरम्यान, भाजपा नेते मोहित कंबोज भारतीय यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. '१ जून ही महाविकास आघाडीची तारीख आहे, पण महादेवाशप्पथ सांगतो की ३० जून ही तारीख माझी असेल. १ जुलै तारीख येऊ देणार नाही', असे आव्हान भाजपा नेते मोहित कंबोज यांनी दिले होते. तो व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
भाजपा नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला. मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसीज बँकेकडून ५२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची त्यांनी फसवणूक केली असून त्यांच्यावर कर्ज न फेडल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्जाची रक्कम ज्यासाठी घेतली होती त्यासाठी वापरली नसल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. हा सर्व प्रकार १ जूनला घडला होता. त्यानंतर या प्रकरणावरून मोहित कंबोज यांना इशारा दिला होता.
कंबोज व्हिडीओमध्ये नक्की काय म्हणाले होते?
"मला अपमानाचे भय वाटत नाही. तसेच मला इतरांनी सन्मान द्यावा असा आग्रहीदेखील मी कधीच कुणाकडे धरत नाही. पण ज्यांनी कोणी माझ्याविरोधात षडयंत्र रचलं आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की १ जून ही तारीख तुमची होती, ३० जून तारीख माझी असेल. मी १ जुलै येऊ देणार नाही. महादेवाची शपथ घेऊन सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांनी माझ्याविरोधात हे कारस्थान रचलं आहे, त्यांना मी ३० दिवसांच्या आतच उत्तर देईन", असे मोहित कंबोज म्हणाले.