Sanjay Raut vs BJP Rajya Sabha Election 2022: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाची सरशी झाली. सहापैकी पाच जागांवरील विजय निश्चित होता. पण सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपा यांनी उमेदवार दिला. त्यामुळे त्यांच्यात थेट लढत रंगली होती. मतदान पार पडल्यानंतर काही तांत्रिक बाबी पाहून अखेर मध्यरात्री ४ च्या सुमारास निकाल लागला आणि त्यात भाजपाचे चौथे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. तर शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. या साऱ्या गोष्टींनंतर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
संजय राऊत यांनी शुक्रवारी, निवडणुकीच्या दिवशी काही शायरी ट्वीट केल्या होत्या. "झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं...! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!", अशी शायरी त्यांनी ट्वीट केली होती. त्यावर भातखळकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. "कालची सगळी शायरी उताणी पडली, आज नवं बोलबच्चन. काल मिशां पीळ देत होते आता रडारड...", अशा शब्दांत ट्वीट करत भाजपाकडून संजय राऊतांना टोला लगावण्यात आला.
संजय राऊतांची शायरी-
भाजपाचा राऊतांना टोला-
दरम्यान, या निवडणुकीच्या निकालावर संजय राऊतांनी मध्यरात्रीच प्रतिक्रिया दिली होती. "भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण मी त्यांचा विजय मानायला तयार नाही. पहिल्या पसंतीची सर्वाधिक ३३ मतं संजय पवारांना आहेत, तर भाजपचे विजयी उमेदवार धनंजय महाडिक यांना पहिल्या क्रमाकांची २७ मतं आहेत. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे, हे मान्य आहे. पण भाजपचा दणदणीत विजय झाला, हे चित्र साफ झूट आहे. भाजपने माझं मत बाद करायला लावलं, निवडणूक आयोगावर दबाव टाकून कसला आलाय विजय?" अशी टीका संजय राऊत यांनी भाजपावर केली.