"नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना..."; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 06:44 PM2023-12-07T18:44:28+5:302023-12-07T18:46:19+5:30
नवाब मलिक आज अधिवेशनात सत्ताधाऱ्यांंमध्ये बसल्याने नाराजी
Nawab Malik in Winter Session of Maharashtra, Devendra Fadnavis Letter to Ajit Pawar : महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूरात आजपासून सुरु झाले. देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित राहिले. यावेळी ते सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे अजितदादांच्या गटातील आमदारांसोबत बसले. हा प्रकार पाहून विरोधकांनी गोंधळ केला आणि नवाब मलिकांबाबत काही सवाल उपस्थित केले. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
पत्रातील मजूकर काय?
माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे, असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सत्ता येते आणि जाते.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 7, 2023
पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा… pic.twitter.com/WDzm3Pjo3f
पुढे फडणवीसांनी लिहिले की, त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.