मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये झालेल्या घोळासाठी मुख्यमंत्र्यांना थेट जबाबदार धरताना शरद पवार यांनी फडणवीस हे सर्वात बालीश मुख्यमंत्री आहेत, असे टीकास्त्र सोडले आहे. या आधी झालेल्या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील सहकारी बँकांना अधिक प्रमाणावर झाल्याचा आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे. फर्स्टपोस्ट या इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला. ते म्हणाले,"मुख्यमंत्र्यांना वाटते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखालील बँका आणि सहकारी बँकांना फायदा होणार आहे. पण हा आरोप पूर्णपणे निराधार आहे. आता मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र खात्यांचे आकडे फुगवून सांगितल्याचा आरोप केला आहे. मग आता राष्ट्रीयीकृत बँकाही काँग्रेस-राष्ट्रवादीवाले चालवतात का? कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांची आश्वासनपूर्ती करण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत."येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी न झाल्याच शेतकऱ्यांची असहकार चळवळ सुरू करण्याचा विचार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार करत आहेत. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा अंतिम उपाय असू शकत नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के नफा देण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले होते. विविध कारणांमुळे शेतीक्षेत्रासमोरील वाढत असलेली आव्हाने, शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या तसेच जून महिन्यात शेतकऱ्यांनी केलेला अभूतपूर्व संप या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र अंमलबजावणीमधील अनेक चुकांमुळे या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकला नव्हता. मात्र राज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची निर्णय घेताना आपण शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेतल्याचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला होता. "राज्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याची गरज होती. जेव्हा आम्ही हा निर्णय घेतला. तेव्हा शरद पवार यांना दिल्लीला बोलावले. तिथे राष्ट्वादी आणि भाजपाचेही नेते उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी कर्जमाफीसंदर्भात मार्गदर्शन केले," असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावेळी शरद पवार हे दिलदार विरोधक आहेत. पक्षभेद विसरून ते मागे उभे राहतात. त्यांचा शेतीचा अभ्यास चांगला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारमध्ये सहभागी होताना त्यांनी कृषी खाते मागून घेतले, अशी स्तुतिसुमनेही मुख्यमंत्र्यांनी उधळली होती.
देवेंद्र फडणवीस सर्वात बालीश मुख्यमंत्री, शरद पवारांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 5:02 PM