नवी दिल्ली - महाराष्ट्राचा कारभार हा महाराष्ट्रातून चालत नसून तो दिल्लीतून चालतोय. सगळेच निर्णय, मग ते राजकीय असतील किंवा अन्य काही, अगदी पोलीस स्टेशनलाही दिल्लीतून फोन येतो आणि मंत्री-उपमुख्यमंत्र्यांना माहिती नसते. कुणावर कारवाई करायची, कुणावर नाही, कुणाला सोडायचे, कुणाला अडकवायचे हे दिल्लीतून ठरते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांचे २ उपमुख्यमंत्री दिल्लीत कायमचे राहिले तरी महाराष्ट्राला फारसा फरक पडत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला.
खासदार संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांना विपश्यनेची गरज आहे. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून जे राजकारण आहे त्यात एका कर्तबगार नेत्याला त्यांच्या २ ज्युनिअरच्या हाताखाली काम करावे लागतंय ही अस्वस्था आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टींचे विस्मरण होतंय. गृहखाते ते चालवतायेत असं मला वाटत नाही. गृहखाते असो वा अनेक गोष्टींबाबत दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झालाय, महाराष्ट्र दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय असं आम्ही म्हणतोय ते यासाठीच असं त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र जातीपातीत तुटला जाऊ नये ही आमची भूमिका
मराठा आरक्षणाबाबत राज्यात जो प्रश्न निर्माण झालाय त्याबाबत प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या बैठकीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतोय. वेळ मिळाला तर मी स्वत: अन्यथा शिवसेनेचा महत्त्वाचा नेता या बैठकीला उपस्थित राहील. आक्रमक भाषा टाळायला हवी. महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती अस्थिर आहे. भुजबळ हे एका समाजाचे नेतृत्व अनेक वर्ष करतायेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी संघर्ष करतायेत. हे दोन्ही समाज महाराष्ट्राचे प्रमुख घटक आहेत. राजकारणात जातपात राहू नये ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र जातीपातीत तुटला जाऊ नये ही उद्धव ठाकरेंची आणि शिवसेनेची भूमिका आहे असं राऊतांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील I.N.D.I.A आघाडीची बैठक निर्णायक
इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत १९ डिसेंबरला होत आहे. सर्व घटक पक्षांना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी निमंत्रण पाठवले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह इतर सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहतील. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. परंतु तो कार्यक्रम आटोपून ते बैठकीला येतील. उद्धव ठाकरे दिल्लीत येतील. आज मुक्काम करतील. उद्या केजरीवाल यांच्यासोबतही उद्धव ठाकरेंची भेट आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीचे महत्त्व सर्व पक्षांना माहिती आहे. २०२४ च्या दृष्टीने इंडिया आघाडीची उद्याची बैठक निर्णायक ठरेल. चर्चा संवाद सुरू असून बैठकीत काही निर्णय घेतले जातील. लोकशाहीचे रक्षण करणे हा मुख्य अजेंडा आहे. काँग्रेस आणि घटक पक्षांत काही राज्यांमध्ये जागावाटपांबाबत समन्वयावर चर्चा होऊ शकते असं राऊतांनी सांगितले.