काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांचा सहभाग; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच सादर केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:33 IST2024-12-19T16:32:28+5:302024-12-19T16:33:03+5:30
Devendra Fadnavis : 'भारत जोडोमध्ये 180 संघटना, त्यातील 40 संघटना अर्बन नक्षलवादाशी संबंधित आहेत. आरआर पाटलांच्या काळात या संघटनांना अर्बन नक्सल म्हणून घोषित करण्यात आले.'

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांचा सहभाग; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच सादर केले
Devendra Fadnavis : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच भाषण केलं. त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी फडणवीसांनी शहरी नक्षलवादाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. तसेच, काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवादी संघटनांचा सहभाग होता, त्यांनी काँग्रेससाठी देशभरात कार्यक्रम घेतले होते, असेही फडणवीसांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, 'निवडणूक जिंकण्यासाठी काय काय केलं...पहिल्यांदाच महाराष्ट्रात बहितलं, कुणीतरी येतो आणि व्होट जिहादचा नारा देतो. 17-17 मागण्या तुम्हाला देतात आणि तुम्ही चकार शब्द काढत नाही. खरं षडयंत्र सांगतो, मालेगावमध्ये 2024 मध्ये काही युवकांनी पोलिसांत तक्रार केली की, 114 कोटी रुपयांची निनावी रोख रक्कम बँक खात्यांमध्ये आली आहे. आरोपी सिराज मोहम्मदने 14 लोकांची पॅन आणि आधार कार्ड वापरुन मालेगाव मर्चंट बँकेत खोटी खाती उघडली आणि रक्कम त्या खात्यात टाकली. पोलीस, ईडी, आयकर विभागाने चौकशी केल्यावर समजले की, देशभरात हजारो कोटींचा व्यवहार झालाय. त्यातील 600 कोटी दुबईला गेले, तर 100 कोटी निवडणुकीच्या काळात वापरले गेले.'
'निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्या स्थराला जात आहोत. देशाच्या निवडणुकीत परकीय हस्तक्षेप सुरू झालाय, त्याचेही पुरावे संसदेत मांडले गेलेत. मी 'भारत जोडो' अभियानावर बोललो होतो, तर माझ्यावर टीका केली. मी आज पुराव्यासह सांगतो. हे अभियान राहुल गांधींनी सुरू केलं होतं. त्या अभियानात कोण आहे, जरा बघा. देशात आपण नक्षलवादाविरोधात लढाई पुकारतो. नक्षलवादी काय करतात? भारताच्या संविधनावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कोणत्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे पॅरलल राज्य तयार करायचे आहे, असा नक्षलवाद्यांचा मानस आहे.'
40 नक्षलवादी संघटनांचा भारत जोडो यात्रेत सहभाग
फडणवीस पुढे म्हणतात, 'ज्यावेळी देशात नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरू झाली, मोठ्या प्रमाणात नक्षलवादी संपायला लागले, त्यावेळी हा नक्षलवाद शहरांमध्ये सूरू झाला. तेच अराजकतेचे विचार आपच्या मुलांमध्ये रोवले जात आहेत. 16-28 वयापर्यंत प्रत्येकाच्या मनात क्रांतीची भावना असते. या वर्गाला पकडून, यांच्यात अराजकतेचे रोपण करायचे, यासाठी फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार करण्याचे काम नक्षलवाद्यांनी केले. याचे पॉप्युलर नाव अर्बन नक्सल, असे आहे. संविधानाचे नाव घ्यायचे, पण संविधानाने तयार केलेल्या सर्व शासकीय संस्थेबद्दल लोकांमध्ये संशय तयार करायचा आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, असे काम करायचे.'
'असे झाल्यावर काय होईल, तर लोक बंड करतील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य आणतील. हाच तर त्यांचा प्रयत्न आहे. 15 नोव्हेंबर 2024 काठमांडूला बैठक झाली, यात भारत जोडोची काही लोकं गेली होती. त्याचा सगळा रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये अराजकता पसरवण्याची योजना आखली हगेली. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. या भारत जोडोमध्ये 180 संघटना आहेत, त्यांनी निवडणुकीच्या काळात देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले. त्यात 40 संघटना अशा आहेत, ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून नेम केलेलं आहे. मी नाही केलं, तर 2012 साली गिरीष बापट यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी आरआर पाटील राज्याचे गृहमंत्री होते. हा प्रश्न पुणे जिल्ह्यातील नक्षलवादी कार्यक्रमाबाबत होता.'
तुमचा खांदा अशा संघटनांना देऊ नका
'त्या प्रश्नाला उत्तर देताना आरआर पाटील म्हणाले होते की, या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख अर्बन नक्सल म्हणून केलेला आहे. आता याच संघटनांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधकांसाठी कार्यक्रम घेतले. आरआर पाटील यांच्या काळात 48 संघटनांना अर्बन नक्सल म्हणून नेम केलेलं आहे. 18 फेब्रुवारी 2014 साली मनमोहन सिंग यांचे सरकार होते, तेव्हा 72 फ्रंटल संघटनांचे नावे समोर आली होती, त्यातील 7 महाराष्ट्रातील आहेत. याच सात संघटनांनी लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसची कामे केली. विरोधकांच्या देशभक्तीवर आमचा अविश्वास नाही, पण निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणीची मदत घेत आहोत, हे पाहिले पाहिजे. तुम्हाला हात जोडून विनंती आहे...तुमचा खांदा अशा संघटनांना देऊ नका, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.