राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या धडाकेबाज भाषणांमुळे सतत चर्चेत असतात. कधी कधी वादग्रस्त विधानांमुळे ते टीकेचे धनीही ठरतात. असलं तरी आपल्या भाषणाची शैली मात्र ते बदलत नाहीत. सध्या हेच गुलाबराव पाटील सोशल मीडियावर नेटिजन्सकडून ट्रोल होत आहेत. याच कारण म्हणजे गुलाबराव पाटलांच्या फेसबुक पेजवर अलीकडे पोस्ट केलेले काही पोस्टर आहेत. याच पोस्टरवरून गुलाबराव पाटील सध्या चर्चेत आले आहेत.
तीन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे गटाला दिल्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटलांच्या फेसबुक पेजवर काही पोस्टर पोस्ट केले आहेत. या पोस्टरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. त्याच फोटोंना काही नेटिजन्सने आक्षेप घेतला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने गुलाबराव पाटलांच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभा करून त्यांचं टेन्शन वाढवलं होतं. भाजपच्या याच भूमिकेची तक्रार गुलाबराव पाटील एका जाहीर सभेत थेट नरेंद्र मोदींकडे करणार होते. पण तेव्हा गिरीश महाजनांनी मध्यस्थी केल्यामुळे गुलाबराव शांत झाले होते. नंतरच्या काळात महाविकास आघाडीत असताना गुलाबराव पाटलांनी भाजपला बंडखोरीच्या मुद्द्यावर अनेकदा लक्ष केलं. पण आता वारं फिरलं आणि गुलाबरावांना भाजपचे गोडवे गावे लागत आहेत असं म्हटलं जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"