Devendra Fadnavis vs NCP: राज्याच्या राजकारणात सध्या विविध गोष्टींची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देताना शपथविधीमुळे झालेला फायदा सांगितला होता. या दोघांच्या वक्तव्यानंतर राज्यात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तशातच, "मी अजून काही गोष्टी बाहेर काढणार आहे," असे फडणवीस म्हणाले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना दोन सवाल करण्यात आले आहेत.
"मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे, तुम्हाला सगळे समजेल' असे देवेंद्र फडणवीस जी पहाटेच्या शपथविधीबद्दल सांगत आहेत. मग त्यांनी रात्रीच्या षडयंत्रानंतर झालेल्या पुढील दोन गोष्टी का झाल्या हे पण सांगावे... 'मी पुन्हा येईन' बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि 'मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही' सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे," असे ट्वीट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता क्लाईड क्रास्टो यांनी केले.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
"मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल. हळूहळू सगळे गौप्यस्फोट होत आहेत. मी जे बोललो तेच कसे खरे होते, हे तुम्हाला हळूहळू समजत आहे. मात्र सध्या तुम्हाला अर्धेच समजलेले आहे. अर्धे समजायला अद्याप वेळ आहे. मी काहीही बोललो की समोरून आणखी दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे मी हळूहळू सर्व गोष्टी बाहेर काढणार आहे. काळजी करू नका. तुम्हाल सगळे समजेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.