Sanjay Raut Devendra Fadnavis: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ घोटाळाप्रकरणी जामिनावर सुटका झाल्यानंतर आज ते १०३ दिवसांनंतर प्रसार माध्यमांसमोर आले. यावेळी संजय राऊत यांनी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचं विधान केले. राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हा मी तुरुंगात होतो. पण देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातले सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांच्या या विधानानंतर फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली.
"संजय राऊतांनी माझी भेट मागितली असेल तर मी त्यांना नक्कीच त्यांना भेटेन. मी कोणाचीही भेट नाकारत नाही. राजकारणातील कटुता संपवायची असेल तर त्यासाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळींनी प्रयत्न करायला हवेत. कुठलाही एक पक्ष ही कटुता संपवू शकत नाही. नेत्यांनी शांत राहायचे आणि बाकीच्यांना बोलायला लावायचे हे थांबले पाहिजे. संजय राऊत कोणाबद्दल काय बोलले हे मला माहिती नाही. संजय राऊत यांच्याबद्दलचे निर्णय योग्य की अयोग्य हे मी बोलू शकत नाही. कारण ते प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेच्या आधीन आहे," असे अतिशय स्पष्टपणे देवेंद्र फडणवीसांनी मत मांडले.
राजकीय कटुचा संपली पाहिजे- संजय राऊत
"राज्यातील राजकीय कटुता संपवली पाहिजे अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली त्याचं मी स्वागत करतो. राज्यात नवं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी काही निर्णय नक्कीच चांगले घेतले आहेत. विरोधाला विरोध आम्ही करणार नाही. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्रीच चालवात आहेत. महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत. म्हाडाचे अधिकार आम्ही काढले होते ते फडणवीसांनी पुन्हा बहाल केले असे काही निर्णय कौतुकास्पद आहेत. त्यामुळे कामानिमित्त पुढच्या काही दिवसात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहे", असे संजय राऊत म्हणाले.