मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच आम्हाला ऊर्जा दिली. त्यांच्या फक्त 10 ते 15 मिनिटांच्या भेटीने आम्हाला कायम उत्साह दिला, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या 'माझा सन्मान' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
मी 1995 ते 99 च्या दरम्यान दोन-तीनदा बाळासाहेबांना भेटलो. मी त्यांना भेटलो. ते मला भेटले नाहीत, असं मी त्या भेटींबद्दल म्हणेन. कारण त्यावेळी मी खूप लहान कार्यकर्ता होतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. मी आमदार झालो, त्यावेळी बाळासाहेब युतीच्या आमदारांना मार्गदर्शन करायला यायचे. त्यावेळी आमचं सरकार गेलं होतं. त्यामुळे आमदारांमध्ये निराशा होती. मात्र, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या वक्तृत्वात एक विलक्षण जादू होती. ते 10 ते 15 मिनिटं आमदारांशी संवाद साधायचे. मात्र त्यामुळे आम्हाला खूप ऊर्जा मिळायची. सत्ताधाऱ्यांपेक्षा आपण मजबूत आहोत हा विश्वास बाळासाहेब द्यायचे, अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या.
तसेच उद्धव ठाकरे यांनाही त्या काळात भेटलो होतो. तेव्हाचे उद्धव ठाकरे आजही तसेच आहेत. त्यांच्यात काहीही बदल झालेला नाही, असेही फडणवीस म्हणाले.