मुंबई - मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे याची मला कल्पना आहे. जर एकनाथ शिंदे यांनी सांगितले, मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचाय, पण त्यांच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असेल. तर मी त्याच क्षणी राजीनामा देईन आणि मी राजकारणाचा सन्यास घेईन असं सर्वात मोठं विधान मराठा आरक्षणावरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचे आहे. मग ते सगेसोयरे असेल, मराठा आरक्षण असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना करू देत नाही असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मी मराठा आरक्षणाच्या मध्ये येतोय असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी कुठलाही प्रयत्न केला आणि मी तो थांबवला असं शिंदेंनी सांगितले तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन. आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले नाहीतर शिंदेंनी केले. एकनाथ शिंदेंच्या पाठिशी मी भक्कपणाने उभा राहिलो आहे. परंतु अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले होते मनोज जरांगे पाटील?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देतील पण त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी करत फडणवीसांना लक्ष्य केले होते. मराठा आणि धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोघांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केले. फडणवीस हे जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत. त्याचे फळ त्यांना भोगावी लागतील असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले होते.