"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 03:13 PM2024-11-02T15:13:05+5:302024-11-02T15:19:04+5:30

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना १० वर्षे सिंचन घोटाळ्याची फाईल दाखवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

Devendra Fadnavis response to Jayant Patil allegations regarding the irrigation scam | "अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"

"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"

Maharashtra Assembly Election 2024 : सिंचन घोटाळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या खुलाशावरुन सध्या राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासवागच्या सभेत बोलताना अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा उल्लेख करत सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केलं होतं. अजित पवारांनी केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे. भाजपने अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याचे जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटलांच्या आरोपांना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केला आहे. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७० हजार कोटी रुपयांच्या कथित सिंचन घोटाळ्याच्या खुल्या चौकशीसाठी माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर. पाटील यांच्या स्वाक्षरी असलेल्या फाईल्स त्यांना दाखवल्या होत्या, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी हा आरोप केला.

"राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह वाढवण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे अजित पवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. तुम्ही (फडणवीस) विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले. सत्तेत आल्यानंतर त्यांची चौकशी केली आणि आरआर पाटील यांच्यावर आरोप करणारी फाइल त्यांना दाखवली. म्हणजे तेव्हापासून आमच्या पक्षातील अंतर्गत कलहाला खतपाणी घालण्याचे प्रयत्न सुरू होते. अजित पवारांना इतर फाईल्स दाखवून दहा वर्षे ब्लॅकमेल करण्यात आले. यावरून त्यांना पुन्हा पुन्हा भाजपसोबत जाण्याची इच्छा का होती हे स्पष्ट होते. अजित पवारांना ब्लॅकमेल करण्यात आले," असं जयंत पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.

"मला वाटते की ते (अजित पवार) यामुळेच घेरले गेले आहेत. मात्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आणखी अडचणीत आणले आहे. यातून फडणवीस यांची कार्यशैली तसेच गेल्या दहा वर्षांतील त्यांच्यातील संबंधही समोर आले. त्यांनी ती फाईल विरोधी पक्षनेत्यांना दाखवली असती तर मला समजले असते. पण ते (अजित पवार) फक्त विरोधी आमदार होते," असेही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "जयंत पाटील यांचा चेहरा बघा. ते मस्करीच करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायमच असतं. त्यांना तुम्ही गांभीर्याने घेऊ नका," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते अजित पवार?

"२०१४ साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतले आणि आर. आर. पाटील यांनी स्वाक्षरी केलेली फाईल दाखवली. एसीबीमार्फत माझी खुली चौकशी करण्याचे आदेश आर. आर. पाटील यांनी दिले होते. मला ही गोष्ट कळल्यानंतर दुःख वाटले. आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापल्याची भावना निर्माण झाली," असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

Web Title: Devendra Fadnavis response to Jayant Patil allegations regarding the irrigation scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.