पुणे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गाडीवर चप्पल फेकल्याची घटना काल पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली होती. फडणवीस रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी फडणवीसांच्या गाडीवर चप्पर भिरकावण्यात आली. दरम्यान, त्या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?रोहित पवार यांनी ट्विट केले की, ''विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही,'' असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांचे ट्विट:-
'चिल्लर लोक असतील...'यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क केला असता, 'हे लोक कोण होते मला माहित नाही, फालतू, चिल्लर लोक असतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघतेय, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करत आहेत.'
'बुद्धीची कीव येते''स्वतः काही करायचं नाही, आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगली कामे केली. याचा त्यांच्या मनामध्ये राग आहे. पण, मला एका गोष्टीचं दुःख आहे की, मराठा आरक्षणाकरता ज्या अण्णासाहेब पाटलांनी सर्वस्व पणाला लावलं आणि आपला जीव दिला. त्या अण्णासाहेब पाटलांच्या पुतळ्याच्या उदघटनाच्या कार्यक्रमाला विरोध करण्याचं काम आणि अटलजी यांना विरोध होण्याचं काम यांनी केलं. मला यांच्या बुद्धीची कीव येते', असं फडणवीस म्हणाले.
भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेकालच्या घटनेनंतर भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांकडून मोदींचा नारा दिला जात होता तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मोदी चोर है असा नारा दिला जात होता. यावेळी पोलीसांनी जमावावर लाठीचार्ज केला, यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका जखमी झाल्या आहेत.