लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील एकनाथ शिंदे-भाजप सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप व शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिली. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची तयारी म्हणून आमदारांची ही बैठक शनिवारी रात्री एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. यावेळी फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल आणि तो दोन टप्प्यात असेल असे स्पष्ट केले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होणारा विस्तार हा लहान असेल आणि मोठा विस्तार हा अधिवेशनानंतर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होणार होते. मात्र, राष्ट्रपती निवडणूक त्याच दिवशी असणे आणि अद्यापही न होऊ शकलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. ते २५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार २० जुलै रोजी केला जाऊ शकतो. अधिवेशनाच्या तयारीसाठी नवीन मंत्र्यांना किमान चार दिवसांचा अवधी दिला जाईल. १५ ऑगस्टपूर्वी दुसरा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.
कोणाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न
- मंत्रिमंडळाचा विस्तार हा भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. औरंगाबाद, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, मुंबई उपनगर, जळगाव हे असे जिल्हे आहेत जिथून भाजप व शिंदे गट मिळून अनेक जण इच्छुक आहेत. त्यातून कोणाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न नेतृत्वाला सतावत आहे. विभागीय व जिल्ह्यांचे संतुलन साधताना कसरत होत आहे.
- भाजपमध्ये जुन्यांना संधी दिली तर नवे नाराज, नव्यांना संधी दिली तर जुन्यांमध्ये रुसवेफुगवे होण्याची शक्यता आहे. शिंदे गटात इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे नाराजीनाट्याची शक्यता अधिक आहे.