कोकणातली संस्कृती पाहता इथला आंबा जास्त गोड की लोक जास्त गोड असा प्रश्न मला पडतो. कोकणी माणूस अतिशय सरळ आणि निर्मळ आहे. पण त्याचवेळी एखाद्याशी पंगा घेतला की घरदार विकून देखील चार पिढ्या पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते भाजपा आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील समृद्धता, पर्यटनाची ताकद आणि प्रकल्प अशा विविध गोष्टींवर भाष्य केलं. "कोकणची संस्कृती पाहता मला प्रश्न पडतो की कोकणातली आंबा जास्त गोड की इथले लोक जास्त गोड? कोकणी माणूस अतिशय सरळ आणि निर्मळ मनाचा आहे. पण त्याचवेळी एखाद्याशी पंगा घेतला की तो घरदार विकून देखील कोर्ट-कचेरी करुन चार पिढ्या हा पंगा संपवल्याशिवाय थांबत नाही. चांगूलपणा ही कोकणी माणसाची शिदोरी आहे. चांगल्याकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्याला आणखी चांगलं कसं देता येईल हा आमचा प्रयत्न असेल", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही झालं तरी प्रदूषणकारी रिफायनरी आणणार नाहीनाणार प्रकल्पाच्या वादावरही फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "कोकणच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. काही झालं तरी कोकणात एकही प्रदूषणकारी रिफायनरी आणणार नाही. आम्ही आधीच सांगितलं होतं की नाणारमधली रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी असणार आहे. या रिफायनरीमुळे कोकणातील १ लाख लोकांचा थेट रोजगार तर ५ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. तसंच रिफायनरीच्या कॅम्पसमध्ये ५ एकर जागेवर फक्त आणि फक्त ग्रीनरी करण्याची अट असणार आहे. पण काही लोकांना कोकणचा विकास नको आहे. लोकांच्या भावना भडकावून मतं घेऊन केवळ राजकारण त्यांना करायचं आहे. पण आम्ही कोकणात रिफायनरी करू दाखवू आणि कोकणचा विकास करुन दाखवू. इतकंच नव्हे, तर कोकणचं पर्यावरण आहे त्यापेक्षाही चांगलं करून दाखवू हा आमचा निर्धार आहे", असं फडणवीस म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"