Devendra Fadnavis BJP Shiv Sena Alliance: एकनाथ शिंदे हे येताना बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन बाहेर पडले. ज्यांच्या विरोधात इतके वर्षे शिवसेना लढली, त्यांच्यासोबत त्यांना बसावं लागत होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा रोज अपमान केला जात होता, बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलेल्यांसोबत बसावं लागत होतं, राष्ट्रीय सुरक्षेशी गद्दारी केलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या लोकांसोबत कारभार करावा लागत होता. हे खऱ्या शिवसैनिकांना मान्य नव्हतं. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचा खऱ्या हिंदुत्वाचा विचार घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळेच, हे सरकार खऱ्या अर्थाने भाजपाचे 'हिंदूसैनिक' आणि बाळासाहेबांचे 'शिवसैनिक' यांचे सरकार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर स्पष्टीकरण
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले हे ठरवून घडलं. अचानक घडलेलं नाही. भाजपा सत्तापिपासू नाही हे आम्ही दाखवून दिलं. एकनाथ शिंदे हे त्यांच्या आमदारांना सोबत घेऊन एक विचारांची लढाई लढत होते. अशा वेळी त्यांना शक्ती देणं आणि नेतृत्व देणं हे गरजेचं होतं. चंद्रकांत दादा म्हणाले त्याचा चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला", असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीसांनी दिले.
शिवसेनेने २०१९ मध्ये गद्दारीच केली!
"शिवसेनेने 2019 मध्ये भाजपाशी गद्दारी केली. मी साक्षीदार आहे की आम्ही कोणताही शब्द दिला नव्हता. पंतप्रधान मोदीजी, अमित शाह, उद्धव ठाकरे सारेच सांगत होते की फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवसेना राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं. निवडणूक निकालाच्या आधीच, आमचे मार्ग खुले, असं ते सांगू लागले. मी फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. कारण त्यांचं आधीच ठरलं होतं", असा आरोप फडणवीसांनी केला.
आता गतिशील सरकार सत्तेत!
"आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. आता जनतेचं सरकार आलंय. राज-रोज पणे हे सरकार आलंय आणि आता खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं सरकार सत्तेत आहे. महाराष्ट्र आता वेगाने पुढे जाणार आहे. कारण महाविकास आघाडीने केवळ स्थगिती आणि चौकशी करण्यात पहिले ३० दिवस घालवले. पण शिंदे-फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आणि आता एक निर्णयक्षम आणि वेगवान गतिशील सरकार सत्तेत असल्याचे सर्वांनाच समाधान आहे", अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.