राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप युतीच्या सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे आणि जनतेला दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. यातच एक निर्णय, आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना जेलमध्ये रहावे लागले. त्यांना गौरव निधी अथवा पेन्शन देण्यासंदर्भातही घेण्यात आला आहे. याची घोषणा स्वतः राज्याचे DCM देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'लोकतंत्र संग्राम सेनानी'ना मिळणार पेन्शन - फडणवीस म्हणाले, "आणिबाणीच्या काळात ज्या लोकांना जेलमध्ये रहावे लागले. त्या लोकांना देशातील वेगवेगळ्या सरकारांनी गौरव निधी अथवा पेन्शन देण्याचा निर्णय गेल्या १५-२० वर्षांपूर्वीच घेतला होता. बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानने हा निर्णय घेतला होता. मात्र, महाराष्ट्रात तो प्रलंबित होता. २०१८ साली आम्ही तो निर्णय घेतला होता. पण २०२० साली मागील सरकारने तो निर्णय स्थगित केला होता. मात्र, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा तो निर्णय लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जवळपास ३६०० 'लोकतंत्र संग्राम सेनानी' आहेत. की ज्यांना आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला. त्यांना आम्ही हे पेन्शन देणार आहोत आणि आणखीही ८०० अर्ज आहेत ते मेरीटवर डिसाईड होतील."
पेट्रोलच्या दरातही कपात -याच बैठकीत राज्य सरकारने पेट्रोलवरील करात ५ रुपये तर डिझेलवरील करात ३ रुपयांची कपात करून सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यामुळे आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ५ आणि ३ रुपयंनी कमी होतील. यामुळे इतर वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींपासूनही जनतेला दिलासा मिळेल.