Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray: भाजपा विरूद्ध उद्धव ठाकरे हा २०१९ पासून सुरू झालेला संघर्ष आता अधिकच तीव्र होता चालला आहे. नागपूरच्या एका सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख कलंक असा केला. त्यामुळे सध्या राजकारण चांगलेच पेटले आहे. देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजपा नेतेमंडळींनी ठाकरेंवर टीका केली. पण त्यानंतर मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. 'कलंक हा शब्द एवढा जिव्हारी लागला असेल तर दुसऱ्यांवर आरोप करताना भान ठेवा', असे ठाकरेंनी सुनावलं. पण त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, असे फडणवीस म्हणाले.
"आमचे आताचे राजकीय विरोधक आणि पूर्वाश्रमीचे मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फारच विपरित परिणाम झालेला दिसतो या गोष्टीचं मला अत्यंत दु:ख आहे. कदाचित त्यांना मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती याठिकाणी पाहायला मिळत आहे. अशा मानसिकतेतून जर एखादी व्यक्ती बोलत असेल तर त्यावर बोलणं योग्य नाही. कारण ही एक मानसिक स्थिती आहे. ती आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया न देणं इष्ट", अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावरील टीकेला खोचक उत्तर दिले.
"तुम्ही म्हणाल तो भ्रष्ट आणि तुम्ही म्हणाल तो देव, हा कुठल्या प्रकारचा न्याय आहे. तुम्ही ज्या प्रमाणे एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून कलंकित करत आहात आणि नंतर त्यांना मंत्रिमंडळात घेता. अशा वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी कसं वागायचं? कलंक शब्दावरून एवढे आक्रमक होण्याचे कारण काय? कारण सत्ताधारी भाजपकडून सुरू असलेला कारभार हा महाराष्ट्रासाठी एक कलंकच आहे. तो लावणं त्यांनी थांबवावं. भाजपच्या सरकारनं लोकांच्या दारी जावं, पण घरातल्या लोकांचा तळतळाट घेऊन येऊ नये," असे उद्धव यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर फडणवीसांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता हा नवा वाद आणखी किती खेचला जातो, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.